बीड : दहावी, बारावीच्या परीक्षा जवळ येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी अभ्यासात मग्न झाले आहेत. प्रशासनही कामाला लागले असून, परीक्षा प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी केंद्रांवर तीन अधिकाऱ्यांचे बैठे पथक राहणार आहे. यंदा दहावीचे सहा तर बारावीचे चार परीक्षा केंद्रे वाढली आहेत.बारावी परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. २६ फेब्रुवारीपर्यंत परीक्षा होणार आहेत. तर दहावीच्या परीक्षा ३ ते २६ मार्चपर्यंत पार पडतील. गतवर्षी दहावीसाठी १३७ तर बारावीसाठी ८४ केंद्रे होती. यावेळी विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे केंद्रांच्या संख्येतही भर पडली आहे. दहावीसाठी १४३ केंद्रे असून ८८ केंद्रांवर बारावीच्या परीक्षा होणार आहेत. १५ हजार ७२ इतके अनुत्तीर्ण विद्यार्थी दहावीची परीक्षा पुन्हा एकदा देतील.दरम्यान, बारावीसाठी विज्ञानचे १४ हजार ८८८, कला शाखेचे १४२८ विद्यार्थी आहेत. वाणिज्य शाखेचे २९३८ विद्यार्थी परीक्षा देतील. व्यवसाय अभ्यासक्रमासाठी १५६१ विद्यार्थी आहेत. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी दक्षता समितीची बैठक घेतली. यावेळी अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, सीईओ नामदवे ननावरे, शिक्षणाधिकारी (प्रा.) सुखदेव सानप, शिक्षणाधिकारी (मा.) लता सानप यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
परीक्षा केंद्रांवर राहणार बैठे पथक
By admin | Published: February 15, 2015 12:42 AM