सुधीर मुनगंटीवार : महावादीवार व डोहणे यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळासावली : सावली नगराच्याच नव्हे तर संपूर्ण तालुक्याच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. मी राज्याचा अर्थमंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते सावली तालुका पत्रकार संघाच्या गुणगौरव सोहळ्यानिमित्त उद्घाटनपर भाषणात बोलत होते.सदर सोहळ्यात ‘अग्निपंख’ या स्मरणिकेच्या प्रकाशनासोबतच ज्येष्ठ पत्रकार व सावली तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष ना.वि. महावादीवार यांचा अमृत महोत्सव तसेच संस्थापक सचिव यशवंत डोहणे यांचा षष्ठ्द्विपूर्ती सोहळा साजरा करण्यात आला. शिवाय तालुक्यातील इयत्ता १०वी व १२ वीतून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. पुढे बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले की, तालुक्याच्या समस्या सांगा. त्या मी यथाशिघ्र सोडवून निधी उपलब्ध करून देईल. तसेच येथील शासकीय कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामास प्राधान्यक्रम देईल, असे आश्वासन त्यांनी दिले. प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्ष सावली-ब्रह्मपुरी क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार होते. प्रमुख पाहुणे चिमूर-गडचिरोली क्षेत्राचे खासदार अशोक नेते, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, माजी जि.प. उपाध्यक्ष संदीप गड्डमवार, माजी जि.प. सभापती दिनेश चिटनूरवार, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबईचे उपाध्यक्ष बंडू लडके, चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मुरलीमनोहर व्यास, सावलीच्या नगराध्यक्ष रजनी भडके, उपाध्यक्ष विलास यासलवार आदी मंचावर उपस्थित होते.याप्रसंगी ‘सावली तालुका भूषण’ म्हणून कर्करोग तज्ज्ञ डॉ. नितीन तुकाराम बोमनवार व उपमुख्य कार्यपालन अधिकारी पदावर निवड झालेले कुणाल रूपचंद उंदिरवाडे यांच्यासह नगराध्यक्ष व उपाध्यक्ष यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. शिवाय स्थानिक पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचाही गौरव करण्यात आला.अध्यक्षीय भाषणात आ. वडेट्टीवार यांनी ना. मुनगंटीवार यांचा गुणगौरव केला. तसेच मुनगंटीवार यांनी या क्षेत्राच्या विकासाकडे विशेष लक्ष देऊन गेल्या २३ वर्षांपासून उपेक्षित तालुक्याला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. सर्वप्रथम प्रत्येकांना एक झाड देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय गडकरी यांनी केले. संचालन सचिव सूरज बोम्मावार तर आभार सहसचिव प्रकाश लोनबले यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
सोयगाव तालुक्यातील ८७ गावांतील रुग्णांचे हाल
By admin | Published: October 05, 2016 12:57 AM