औरंगाबाद : शहरातील दंगलग्रस्त भाग असलेल्या शहागंज, राजाबाजार, नवाबपुरा, चेलीपुरा, मोतीकारंजा, गांधीनगर आणि चंपाचौक परिसरातील दंगलीमुळे विस्कळीत झालेले जनजीवन सोमवारी (दि.१४) पूर्वपदावर आले. राजाबाजार ते नवाबपुरा, संस्थान गणपती परिसरातील वाहतुकीसाठी बंद केलेले रस्तेही खुले करण्यात आले. रस्त्यावर साचलेले दगडगोटे, कचऱ्याचा खच हटवण्यात आला.
११ व १२ मे रोजी शहरात भीषण दंगल पेटविण्यात आली होती. दंगेखोरांनी दुकाने, चारचाकी, दुचाकी जाळल्या होत्या. पेट्रोल-डिझेल बॉम्ब, गोट्या, मिरची पूड, दगडफेकीत शेकडो नागरिक, पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले आहेत. ही दंगल नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनीही अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत गोळीबार केला, तेव्हापासून विस्कळीत झालेले जनजीवन सोमवारी पूर्वपदावर आले. दंगलीचे मुख्य केंद्र असलेल्या राजाबाजार, नवाबपुरा चौकातील दंगलीच्या खाणाखुणा असलेल्या रस्त्यावरील दगडगोटे, लाकडे, जळालेल्या गाड्या रस्त्यावरून हटविण्यात आल्या, तसेच हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
या भागात ये-जा करणा-या वाहनांची संख्या वाढल्यामुळे निर्मनुष्य असणारा भाग पुन्हा एकदा गजबजून गेला होता. संस्थान गणपती मंदिराशेजारी जाळण्यात आलेल्या इमारतीचा मलबा मात्र हटविण्यात आला नसल्यामुळे त्या इमारतीसमोरील रस्त्यावरील वाहतूक सुरू झालेली नव्हती. शहागंज चमन भागातीलही रस्त्यावर असलेला कचरा हटविण्यात आला होता. या भागातही जळालेल्या दुकानांबाहेर नागरिकांनी गर्दी केली होती. दंगलीत वाचलेली दुकाने उघडण्यात आली होती. ग्राहकांचा किरकोळ प्रमाणात प्रतिसादही मिळत असल्याचे दिसून आले. उर्वरित दंगलग्रस्त भागातीलही दुकाने उघडली होती. त्याठिकाणीही नागरिकांनी गर्दी केली होती.