औरंगाबाद : शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. शहराचा पॉझिटिव्हिटी रेट अवघ्या दोन टक्क्यांवर आला आहे. लॉकडाऊनची चेन ब्रेक करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, मृत्युसत्र अजूनही पूर्वीसारखेच सुरू आहे. अनलॉकनंतर पुन्हा परिस्थिती बिघडण्याची भीती शासकीय यंत्रणेला वाटत आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विविध दुकाने हळूहळू उघडण्यावर शासनाचा भर राहणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी नमूद केले.
केंद्र शासनाने अडीच महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील काही जिल्हे रेड झोनमध्ये असल्याचे घोषित केले होते. त्यात औरंगाबादचाही समावेश होता. मागील अडीच महिन्यांमध्ये आरोग्य यंत्रणा, पोलीस, महसूल आदी शासकीय यंत्रणांनी नागरिकांच्या सहकार्याने कोरोनाचा संसर्ग कमी करण्यात मोलाची भूमिका बजावली. शनिवारी शहरात ७१, तर ग्रामीण भागात १५७ बाधित रुग्ण आढळून आले. शनिवारी फक्त कोरानामुळे मरण पावलेल्या नागरिकांची संख्या २३ होती. कोरोना संशयित मृतांची संख्या वेगळीच आहे. संसर्ग कमी होत असला तरी मृत्युसत्र अजिबात थांबायला तयार नाही. त्यामुळे शासकीय यंत्रणेला अजूनही भीती वाटत आहे. शासनाने १ जूनपासून सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्याची मुभा दिली तर उद्रेक होईल, असेही वाटत आहे. शासनाने अनलॉकसंदर्भात वेगवेगळ्या विभागातील अधिकाऱ्यांकडून अभिप्राय मागविले आहेत. बाजारपेठ एकाच वेळी सुरू केल्यास गर्दी होईल, संसर्ग वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. राज्य शासन एकाच वेळी संपूर्ण बाजारपेठ उघडण्यास परवानगी देणार नाही, असेही सूत्रांनी नमूद केले.
व्यापारी दुकाने उघडण्यास उत्सुक
शहरात अगोदर अंशतः लाॅकडाऊन लावण्यात आले. नंतर राज्य शासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले. मागील दोन ते अडीच महिन्यांपासून व्यापाऱ्यांची दुकाने बंद आहेत. पावसाळ्यात दुकानांची डागडुजी आणि आर्थिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्यामुळे शहरातील व्यापारी दुकाने उघडण्यास उत्सुक आहेत.
सक्रिय रुग्णसंख्याही घटली
घाटी रुग्णालय - ७०
सिव्हिल हॉस्पिटल - २५
खाजगी रुग्णालये - १६४
मेल्ट्रॉन हॉस्पिटल -१५४
कोविड केअर सेंटर-२०५
होम आयसोलेशन-३५०
संसर्ग कमी तरी दररोज चार हजार तपासण्या
मे महिना - एकूण तपासण्या
२९ - ३,६३९
२८ - ४,३८८
२७ - ४,३९७
२६ - ३,८७२
२५ - ४,११४