लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘डिजिटल इंडिया’ हा केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण उपक्रम. याद्वारे प्रत्येक ग्रामपंचायतीला उच्चगतीची ब्रॉडबँड सेवा पुरविण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात डिजिटल इंडियाच्या कामाला आणखी गती देण्यासाठी खुद्द टेलिकम्युनिकेशन विभागाचे अतिरिक्त सचिव सिव सैलम शहरात दाखल झाले आहेत. आज बीएसएनएलच्या विभागीय कार्यालयात बसून दिवसभर बैठका घेतल्या. या योजनेचे काम कसे चालले आहे, याची प्रत्यक्षात माहिती घेण्यासाठी उद्या, शनिवारी ते ग्रामीण भागाचा दौराही करणार आहेत.केंद्र सरकारच्या नॅशनल आॅप्टिक फायबर नेटवर्कच्या पहिल्या टप्प्यात औरंगाबाद जिल्ह्यातील ३६३ ग्रामपंचायतींची जोडणी करण्यात येणार आहे. बीएसएनएलने आजपर्यंत यातील १८१ ग्रामपंचायतींना अतिशय उच्चगतीची ब्रॉडबँड सेवा पुरविली आहे. याद्वारे सुमारे ८०० कि.मी.पेक्षा जास्त आॅप्टिकल फायबर केबल्स टाकल्या आहेत. येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत उर्वरित १८२ ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड सेवा पुरविण्यात येणार आहेत. यामुळे ग्रामीण भागात संचार क्रांती घडून येणार आहे. याशिवाय मोबाइल नेटवर्कचे अद्ययावतीकरण अंतर्गत जिल्ह्यात १५८ नवीन थ्री जी व आणि ४५ नवीन टू जी टॉवर उभारण्यात येत आहे. मोबाइल नेटवर्कच्या विस्तारानंतर कव्हरेज समस्येचे निराकरण होईल व डेटा स्पीड मोठ्या प्रमाणात वाढेल.
सिव सैलम शहरात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 1:00 AM