छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविणाऱ्या दोन्ही पाणीपुरवठा योजनांवर जायकवाडीत मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची कामे प्रलंबित होती. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शुक्रवारी साडेसहा तासांचा शटडाऊन घेऊन दुरुस्तीची सर्व कामे केली. त्यामुळे दिवसभर शहरात एक थेंबभरही पाणी आले नाही. सर्व जलकुंभ कोरडे पडले.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी येथील नवीन आणि जुन्या पंपगृहाच्या दुरुस्तीसाठी सकाळी ११ वाजल्यापासून शटडाऊन घेण्यात आले. दुरुस्तीचे काम साडेसहा तास चालले. त्यानंतर हळूहळू एकानंतर एक पाण्याचे पंप सुरू करण्यात आले. सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास शहरात पाणी येण्यास सुरुवात झाली. शहरातील जलकुंभ भरून घेण्यासाठी आणखी पाच ते सात तासांचा कालावधी लागणार होता. त्यामुळे शुक्रवारी शहरात पाण्याचा ठणठणाट होता. शुक्रवारी ज्या वसाहतींना पाणी द्यायचे होते, त्यांना शनिवारी पाणी देण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. शनिवारी ज्यांना पाणी देण्यात येणार होते, त्यांना रविवारी पाणी मिळेल.
जायकवाडी येथील पंपगृहातील तांत्रिक कामांसाठी शुक्रवारी पाच तास पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार असल्याचे महापालिकेने कळविले होते. सकाळी ११ वाजता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. प्रत्येक पंपासाठी व्हीसीबी पॅनल बसविणे, व्हॉल्व्हची दुरुस्ती, एमओसीबी काढून त्या ठिकाणी नवीन व्हीसीबी पॅनल बसविणे इ. कामे करण्यात आली. शटडाऊन दीड तासाने वाढविण्यात आला. जुन्या जायकवाडी पंपगृहास वीजपुरवठा करणाऱ्या ३३ के.व्ही. मुख्य फिडरवर महावितरण कंपनीमार्फत एमआयडीसी पाणीपुरवठा योजनेचे ३३ के.व्ही. बसबारला जोडणी करण्यासाठी दीड तास वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला.
शहरातील जलकुंभ कोरडेशटडाऊनमुळे शहरात पाण्याचा ठणठणाट होता. सिडको-हडकोसह गारखेडा, शिवाजीनगर, नक्षत्रवाडी, कांचनवाडी, शहागंज, जिन्सी, विद्यापीठ, हनुमान टेकडी, पहाडसिंगपुरा, बेगमपुरा, लेबर कॉलनी, चिकलठाणा, मुकुंदवाडी, इ. भागांत पाणीपुरवठा करता आला नाही. शहराच्या ८० टक्के भागाला निर्जळीचा सामना करावा लागला. हर्सूल तलावातील पाण्यावर काही वसाहतींना पाणी देण्यात आले.