लोकमत न्यूज नेटवर्कबीड : वडवणी शहरातील एका खाजगी वसतिगृहात ११ वर्षीय मुलाला बेल्टने मारहाण झालेले प्रकरण समोर आले आहे. तब्बल सहा दिवसांनी पालकांनी मुलाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेवरून खाजगी वसतिगृहात मुलांना कशाप्रकारे वागणूक दिली जाते, याचा प्रत्यय येतो. विशेष म्हणजे या वसतिगृहाला परवानगीच नसल्याचे समोर आले आहे.संकेत संभाजी कोळपे (११, चिंचाळा) असे मुलाचे नाव असून गोविंद थापडे असे मारहाण करणाºया वसतिगृह चालकाचे नाव आहे. थापडे यांचे वडवणी शहरातच गोरक्षनाथ निवासी गुरूकूल या नावाचे खाजगी वसतिगृह आहे. या वसतिगृहाला कसलीही परवाणगी नाही. तरीही सर्रासपणे हजारो रूपये घेत ही ‘दुकानदारी’ खुलेआम चालविली जाते. यावर कोणाचेही निर्बंध नसल्याचे ‘लोकमत’नेच समोर आणले होते.दरम्यान, गणेश आंधळे व संकेत या दोन मुलांचा आंघोळ करताना किरकोळ वाद झाला. याचवेळी गोविंद थापडे यांनी रागाच्या भरात या दोन्ही मुलांना बेल्टने मारहाण केली. विशेष म्हणजे ही मारहाण एवढी गंभीर होती की अक्षरश: संकेतच्या अंगाचे सालटे निघाले आहेत. हा प्रकार बाहेर सांगायचा नाही, अशी धमकी मला दिल्याचे संकेत सांगतो. गणेशच्या पालकांना अद्यापही या मारहाणीची माहिती दिली नसल्याचेही संकेतने सांगितले.वसतिगृह चालकावर बालकांचा मारहाण करुन छळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. त्यांनी आंदोलनाचा इशाराही पत्रकाद्वारे दिला आहे.
सहा दिवसानंतर ‘तो’ मुलगा रुग्णालयात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 12:06 AM