औरंगाबाद : ‘आयआयएफएल वेल्थ हुरून इंडिया रिचेस्ट लिस्ट २०२२’ने केलेल्या अब्जाधीशांच्या सर्व्हेमध्ये औरंगाबादच्या उद्योजकांचा समावेश झाला आहे. अनुरंग जैन, तरंग जैन, अशोककुमार सिकची, श्रीकांत बडवे, मन्नालाल अग्रवाल, पद्माकर मुळे यांची नावे देशातील १ हजार ३६ उद्योजकांच्या यादीत झळकली आहेत.
पहिल्या १०० उद्योजकांच्या यादीत अनुरंग जैन यांचे नाव आहे. ८० व्या क्रमांकावर असलेले जैन यांची संपत्ती २० हजार ८०० कोटींच्या घरात आहे. इंड्युरन्स टेक्नॉलॉजी ही त्यांची कंपनी ऑटोमोबाईल्स व ऑटो कॉम्पोनंटस्चे उत्पादन करते.
औरंगाबाद व पुण्यात उद्योग असलेले श्रीकांत बडवे १२५ व्या क्रमांकावर आहेत. १३ हजार ९०० कोटींवर त्यांची एकूण संपत्ती असून बडवे इंजिनिअरिंग ही त्यांची कंपनी ऑटोमोबाईल्स व ऑटो कॉम्पोनंटस्चे उत्पादन करते.
अजंता फार्माचे मन्नालाल अग्रवाल यांचा क्रमांक ३८९ व्या स्थानावर असून त्यांची एकूण संपत्ती ५ हजार १०० कोटींच्या घरात आहे. औषधी उत्पादन त्यांच्या कंपनीतून होते.
तरंग जैन यांचा क्रमांक ३५९ वा आहे. ४ हजार ४०० कोटींवर त्यांची संपत्ती आहे. व्हेरॉक इंजिनिअरिंग ही त्यांची कंपनी असून ती ऑटोमोबाईल्स व ऑटो कॉम्पोनंटस्चे उत्पादन करते.
३८९ व्या क्रमांकावर अशोककुमार सिकची यांचे नाव आहे. ते ४ हजार १०० कोटी रुपयांचे धनी असून क्लीन सायन्स ॲण्ड टेक्नोलॉजी या कंपनीतून केमिकल्स ॲण्ड फार्मा हे त्यांचे उत्पादन आहे.
पद्माकर मुळे यांचे नाव १०३६ व्या क्रमांकावर आहे. १ हजार कोटींच्या घरात त्यांची संपत्ती असून अजित सीड्स ही त्यांची कंपनी कृषी क्षेत्रातील उत्पादन करते.
शिरपेचात मानाचा तुराआयआयएफएल यादीत सहा उद्योगपतींचा समावेश झाल्याने औरंगाबाद चौथ्या क्रमांकावर असून यामुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. ऑटोमोबाईल्स, कृषी, फार्मा, केमिकल्स, तंत्रज्ञान क्षेत्रांतील हे उद्योजक आहेत.
अनुरंग जैन : हे उद्याेगपती स्व. राहुल बजाज यांचे नातेवाईक त्यांनी १९८५ मध्ये ॲण्ड्युरन्स टेक्नाेलॉजी ही कंपनी सुरू केली. त्यांच्या भारतात १७, तर युरोपमध्ये १० कंपन्या आहेत.
श्रीकांत बडवे यांनी १९८८ मध्ये उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. ३ कर्मचाऱ्यांपासून सुरू केल्या. कंपनीत सध्या १५ हजार कर्मचारी आहेत. देशभरात त्यांचे ३० उत्पादन प्रकल्प आहेत.
तरंग जैन : यांची व्हेरॉक इंजिनिअरिंग ही कंपनी असून दुचाकी, तीनचाकी वाहनाला लागणाऱ्या लायटिंग सिस्टमचे उत्पादन तयार करते. जगभरात यांच्या ३७ कंपन्या आहेत.
अशोककुमार सिकची : यांच्या पाच कंपन्या केमिकल, लाईफ सायन्सशी निगडित उत्पादन करतात. मराठवाडा केमिकल इंडस्ट्रीज, मराठवाडा केमिकल, आदी त्यांच्या कंपन्या आहेत.
मन्नालाग अग्रवाल : हे अजंता फार्माचे सहसंस्थापक असून भारतासह आफ्रिकेतील बाजारपेठेत त्यांच्या उत्पादनांना मागणी आहे. गुवाहाटीमध्ये नवीन प्रकल्पांत त्यांनी गुंतवणूक केली आहे.
पद्माकर मुळे : हे पाच दशकांपासून बांधकाम व कृषी संशोधन उद्योगांत आहेत. १९८६ पासून बियाणे, संशोधन, उत्पादनांत त्यांची अजित सीड्स ही कंपनी कार्यरत आहे.