औरंगाबाद: भाजी विक्रेत्या महिलांना लोडींग रिक्षातून नवा मोंढा, जाधववाडी येथे घेऊन जाणाऱ्या रिक्षाला भरधाव कारने मागून धडक दिल्याने रिक्षा रस्त्यावर उलटून झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाले. जळगाव रोडवरील रिलायन्स पंपाजवळ सकाळी ६ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
शशिकला लक्ष्मण जाधव (६७), चंद्रकला अशोक भंडारी(४५), सरस्वती आवारे (३७), आबेद भिकन पठाण (२९,सर्व रा. मिटमिटा), सिंधूबाई राजू आढावे (४०) आणि रिक्षाचालक अमोलराव रामकिसन जाधव(२७,रा. मिटमिटा), अशी जखमींची नावे आहेत.
या अपघाताविषयी प्राप्त माहिती अशी की, रिक्षाचालक अमोलराव जाधव हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी मिटमिटा येथून विक्रेत्या महिलांना त्यांच्या रिक्षात (एमएच २०डीई ३६२१) बसवून नवा मोंढा जाधववाडी येथे भाजीपाला खरेदीसाठी जात होते. जळगाव रोडवरील सिडको बसस्थानक मार्गे ते जाधववाडीच्या दिशेने जात असताना मागून वेगात आलेल्या कारचालकाने (एमएच-२०सीएस९५८५) त्यांच्या रिक्षाला जोराची धडक दिली. यामुळे जाधव यांची रिक्षा उलटल्याने रिक्षातील सर्वप्रवासी रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. अनेकींच्या डोक्याला मार लागला तर काहींच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर कारचालक पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना प्रत्यक्षदर्शी वाहनचालकांनी कारचालकास पकडून त्याच्या कारची चावी काढून घेतली. या घटनेत रिक्षाचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी जाधव यांनी सिडको पोलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.
--------------