औरंगाबाद : उत्तर भारतात वाकड्या बोटांच्या पालीच्या सहा नव्या प्रजातींचा शोध लावण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. यासंदर्भात टेक्सोनॉमिक जर्नल ‘झुटाक्सा’मध्ये सोमवारी पेपर प्रसिद्ध झाला आहे. ही प्रजाती शोधणाऱ्या पाच जणांच्या टीममध्ये मुंबईचा ईशान अग्रवाल आणि पुण्याचा वरद गिरी या दोघांचा समावेश आहे.
या सहा नव्या प्रजातींना गुवाहाटी बेंट टोड गेको (गुवाहाटी वाकड्या बोटांची पाल), नागालँड बेंट टोड गेको, काझीरंगा बेंट टोड गेको, जैंटिया बेंट टोड गेको, अभयापूरी बेंट टोड गेको आणि जामपुरी बेंट टोड गेको अशी नावे देण्यात आली आहेत. दिसायला या सर्व पाली सारख्याच वाटत असल्या तरी त्यांच्या श्रिररचना खूप वेगळ्या आहेत. उत्तर भारतात अशा वाकड्या बोटांच्या पालीच्या आणखी प्रजाती आढळू शकतात, असा दावा ईशान अग्रवाल याने केला. तो सध्या बेंगळूरूत आहे. त्याने याच विषयावर पीच.डी.देखील केली आहे.
अभ्यासासाठी त्याने भारतभ्रमण केले आहे. त्याचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील ‘सेंट झेवियर्स’मध्ये झाले. नंतर डेहरादून येथील वाईल्ड लाईफ इन्स्टीट्यूट आॅफ इंडियामध्येही त्याने शिक्षण घेतले. सहा नव्या प्रजातींचा शोध लावण्याचे काम सर्वात आधी ईशाननेच पीएच.डी.साठी हाती घेतले. नंतर नॅशनल सेंटर फॉर हिस्ट्री सायन्स बेंगळूरूचे माजी क्यूरेटर वरद गिरी, बेंगळूरूचाच आर चैतन्य, अमेरिकेचे पालींवरील जगविख्यात तज्ज्ञ आरोन बाऊर आणि सरडा, बेडूक या प्राण्यांचे तज्ज्ञ लंडनचे स्टीफन मोहनी यांच्या पथकाने या कामाला वाहून घेतले. अखेर या वर्षांच्या प्रारंभी सहा नव्या प्रजाती शोधण्यात त्यांना यश आले. या संशोधनाचा पेपर सोमवारी प्रसिद्ध झाला. वरद गिरीच्या नावावर याआधी ५५ पेक्षा जास्त प्रजातींचा शोध जमा आहे.
पालीच्या २५०वर प्रजातीपालीच्या जगभरात जवळपास २५०वर प्रजाती आढळतात. वाकड्या बोटांच्या पालीच्या सहा नव्या प्रजातींची यात भर पडली आहे. गेल्या दोन वर्षांत पालींच्य २५०वर नव्या प्रजातींची भर पडली आहे. उत्तर भारत आणि हिमालयात आढळणा-या पालींची संख्या यात सर्वाधिक असल्याची माहिती वरद गिरी यांनी ‘लोकमत’ला दिली.