लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यांतर्गत बदल्यांचा पेच कधी सुटणार, याची चिंता सध्या राज्यभरातील जि.प. गुरुजींना सतावत आहे. गंभीर आजार, पती-पत्नी एकत्रीकरण, अवघड क्षेत्र आणि सर्वसाधारण क्षेत्रातील विस्थापित होणा-या शिक्षकांसह सुमारे ६ ते ६.५ हजार शिक्षकांचे बदल्यांकडेच लक्ष असल्यामुळे गुणवत्तेची ‘ऐशी की तैशी’ झाली आहे.साधारणपणे मेअखेरपर्यंत जि.प. शिक्षकांच्या बदल्या होत असत. यंदा राज्यस्तरावरून आॅनलाइन पद्धतीने बदल्यांची प्रक्रिया राबविली जात आहे. आज-उद्या करीत करीत आॅक्टोबर महिनाही मावळला; परंतु अजूनही बदल्यांसाठी मुहूर्त सापडलेला नाही. बघता बघता पहिले शैक्षणिक सत्र संपून आता दुसरे सत्र सुरू व्हायला पाच- सहा दिवसांचा अवधी आहे. बदलीच्या माध्यमातून आपणास सध्याच्या शाळेला मुकावे लागेल, अशी भीती शिक्षकांमध्ये असून, त्यांचे लक्ष विचलित झालेले आहे. अध्ययन-अध्यापनावर त्यांचे फारसे लक्ष नाही. बदली प्रक्रिया राबविणा-या राज्यस्तरीय समितीकडून सातत्याने आॅनलाइन रजिस्ट्रेशन करण्याचा तगादा लावला जात आहे. अनेकदा रात्र रात्र जागूनही बदलीचे पोर्टल ओपन होत नाही. या विवंचनेत शिक्षक आहेत. दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील संवर्ग ४ मधील शिक्षकांसाठी आॅनलाइन रजिस्ट्रेशन करण्याची अखेरची मुदत होती. गंभीर आजार व पती-पत्नी एकत्रीकरण या संवर्ग दोनमधील शिक्षक सोडले, तर अवघड क्षेत्रातील (संवर्ग ३ ) शिक्षक व सर्वसाधारण क्षेत्रातील शिक्षक, बदलीमुळे विस्थापित होणारे शिक्षक, असे मिळून ४ हजार ८७४ पैकी ४ हजार ८४८ शिक्षकांच्या बदल्या होतील, अशी अपेक्षा शिक्षणाधिकारी रविंद्र वाणी यांनी व्यक्त केली आहे. तथापि, गंभीर आजारी व पती-पत्नी एकत्रीकरणामुळे हजार-दीड हजार शिक्षकांना बदलीद्वारे सोयीच्या शाळा मिळणार आहेत.गुणवत्तेची ऐसीतैशीशिक्षकांचे दैनंदिन अध्ययन-अध्यापनाकडे लक्ष कमी; पण बदल्यांकडेच लक्ष अधिक, अशी परिस्थिती आहे.
सहा हजार गुरुजींंचा बदल्यांकडे डोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 12:49 AM