लोकमत न्यूज नेटवर्कवडवणी : महावितरणच्या बेजबाबदार कारभारामुळे वडवणी तालुक्यातील सहा गावांमध्ये ऐन सणासुदीत अंधाराचे साम्राज्य होते. रोहित्र जळाल्यानंतर ते दुरुस्त करून आणण्यात किंवा नवीन रोहित्र देण्यास महावितरणकडून टाळाटाळ केली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.मागील काही दिवसांपासून महावितरणचा कारभार ढेपाळला आहे. त्यामुळे ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दिवाळीसारख्या सणातही तालुक्यातील कान्हापूर, बाहेगव्हाण, मामला, लक्ष्मीपूर, चिंचोटी ही गावे अंधारात होती. आजही या गावात अंधार कायम आहे. कान्हापूर येथील रोहित्र सात दिवसांपूर्वी जळाले आहे. ग्रामस्थांनी नवीन रोहित्राची वारंवार मागणी केली; परंतु महावितरणच्या अभियंत्यांनी याकडे दुर्लक्ष केले. अशीच परिस्थितीत इतर गावांतील आहे. वेळीच दखल घेऊन नवीन रोहित्र दिले नाही व सुरळीत वीज पुरवठा केला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कृष्णा खताळ, उत्रेश्वर खताळ, बाबू सरक, अशोक सलगर यांच्यासह सहा गावच्या नागरिकांनी दिला आहे.
वडवणी तालुक्यातील सहा गावे अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:37 PM