श्यामकुमार पुरे
सिल्लोड : तालुक्यातील अंधारी ग्रामपंचायत निवडणुकीत नवनिर्वाचित सहा महिला सदस्य आपल्या पतीसह दिल्ली, राजस्थान सहलीवर गेल्या आहेत. विरोधक कोणतीही खेळी खेळू शकतात. यासाठी पॅनल प्रमुखांनी ही कमालीची खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे. सदस्य फुटणार नाहीत. पण आम्ही विरोधकांना कोणतीच संधी देणार नाही, असे मत पॅनलप्रमुख दादाराव वानखेडे, ज्ञानेश्वर तायडे यांनी व्यक्त केले. मात्र, तालुक्यातील अन्य गावांमध्ये निवडून आलेल्या महिला सदस्य घरी आणि त्यांच्या नावाखाली पतीराज मात्र सहलीवर गेल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. त्यामुळे महिलांच्या हाती गावाचा कारभार कितीही दिला, तरी त्यांचे पती मात्र लुडबूड करतात. हे यावरून सिद्ध होत आहे.
सिल्लोड तालुक्यात ७७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. आता सरपंच आरक्षणाकडे भावी सरपंचांच्या नजरा लागल्या आहेत. तत्पूर्वी काठावर बहुमत असलेल्या काही ग्रामपंचायतींमधील सदस्य फुटू नयेत, यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली. पॅनलप्रमुख त्यांच्यावर नजर ठेवून आहेत. त्यामुळे गावागावातील राजकारण चांगलेच तापले आहे. अंधारीत १७पैकी १० सदस्य निवडून आल्यावर स्पष्ट बहुमत असतानाही ऐन वेळी विरोधकांकडून दगा होऊ नये. यासाठी पॅनलप्रमुखांनी कमालीची खबरदारी घेतली आहे. सहा नवनिर्वाचित सदस्य असलेल्या महिला आपल्या पतीसह व इतर चार सदस्य असे एकूण दहाचे दहा सदस्य पॅनल प्रमुखासोबत दिल्ली, राजस्थान येथे सहलीवर गेले आहेत. कारण अंधारीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे यांच्या पॅनलचे ७ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे विरोधी पॅनलमधून फोडाफोडी करून सत्तापालट करता येईल का, यादृष्टीने राजकारण सुरू आहे.
या निवडणुकीत मतदारांनी काही प्रस्थापितांना धक्का देत तरुणांना संधी दिली. मात्र, आता अनेकांना सरपंच पदाचे डोहाळे लागले आहेत. ज्यांची सत्ताच येऊ शकत नाही व दोन - चार सदस्य निवडून आलेले आहेत, असे काही पॅनल प्रमुख सर्व पदे तुम्ही घ्या, पण आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला साथ देतो, असे म्हणून फोडाफाडी करताना दिसत आहेत. यामुळे काठावर बहुमत असलेले काही पॅनलप्रमुख जाम वैतागले आहेत.
----------
या गावात बदलू शकते समीकरण
मांडगाव, मांडणा, सिरसाळा, पानवडोद बु. आमठाणा, म्हसला बुद्रुक, पिरोळा, भराडी या ग्रामपंचायतींमध्ये काठावर बहुमत मिळालेले आहे. याशिवाय तालुक्याचे लक्ष असलेल्या भराडीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, गजानन महाजन, राजेंद्र जैस्वाल गटाचे ८, तर अनिस पठाण यांच्या सेनेच्या पॅनेलचे ७ उमेदवार निवडून आले आहेत. भराडीत माजी उपसरपंच अनिस पठाण, तर अंधारीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, पानवडोद बु. येथे भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस विजय वानखेडे ऐनवेळी चमत्कार करू शकतात. निवडून आलेला एकही सदस्य सरपंच निवडीत फुटला तर गावाचे राजकीय समीकरण बदलू शकते.
-----------
५१ ग्रामपंचायतींमध्ये राहणार महिला राज
तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींसाठी २९ जानेवारी रोजी सरपंच आरक्षण सोडत होणार आहे. त्यातील जवळपास ५१ ग्रामपंचायतींची सत्ता ही महिलांच्या हाती राहील, असे चित्र दिसत आहे.