औरंगाबाद : जिल्ह्यात समृद्धी महामार्गाअंतर्गत तीन ठिकाणी कौशल्य विकास, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) निविदा मागविल्या आहेत. ३० वर्षांच्या करारांतर्गत हे केंद्र विकसित करण्यात येणार असून, महामार्गालगतच्या ग्रामीण भागात कुशल मनुष्यबळनिर्मितीसाठी या केंद्राचा उपयोग होईल, असा दावा करण्यात येत आहे.
पाच टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यात औरंगाबाद जिल्ह्यातील हडस पिंपळगाव, घायगाव, बाबतारा येथे ही केंद्रे प्रस्तावित आहेत. एमएसआरडीसी खाजगी संस्थांसोबत भागीदारीतून सदरील केंद्र विकसित करणार आहे. औरंगाबादसह वर्धा, बुलडाणा, ठाणे याठिकाणी सदरील केंद्रे प्रस्तावित आहेत.मागील तीन वर्षांत ५० कोटींची उलाढाल असलेल्या संस्थांना या निविदा प्रक्रियेत भाग घेता येणार आहे.
या क्षेत्राशी निगडित मिळेल प्रशिक्षणकृषिसेवा, आॅटोमोबाईल्स टूल्स, बीएफएसआय, बिल्डिंग अॅण्ड कन्स्ट्रक्शन्स, केमिकल्स अॅण्ड फार्मास्युटिकल्स, शिक्षण, अन्न व प्रक्रिया, जर्म्स अॅण्ड ज्वेलरी, ट्रामा सेवा, आयटी क्षेत्र, वायरलेस सिस्टम, पर्यटन व आदरातिथ्य मार्केटिंग, वाहतूक व दळणवळण, इलेक्ट्रिक, कारपेंटरी, सिव्हिल, वेल्डिंंग, प्लंबिंग आदी विषयांसाठी या केंद्रांतून प्रशिक्षण मिळणार आहे. सध्या मिळणारे शिक्षण अपग्रेड करून रोजगारनिर्मितीसाठी ही केंद्रे निर्माण करण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. ..........