कन्नड ( औरंगाबाद ) : तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज कोसळल्याने चार शेतकऱ्यांची १५ पाळीव जनावरे मृत्युमुखी पडल्याची घटना आज दुपारी घडली. एका ठिकाणी यात १ बैल, ७ गाई, ३ गोऱ्हे व वासरू तर दुसऱ्या ठिकाणी दोन म्हशी व व वगारू दगावले आहे. ( 15 animals were killed due to lightning ) आधीच अतिवृष्टीने ( Heavy rainfall in Aurangabad ) कंबरडे मोडलेला शेतकरी या अपघाती घटनेमुळे हतबल झाला आहे.
अतिवृष्टीने हातची पिके गेल्याने शेतकरी मोडून पडला आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांची भिस्त पशुधनावर आहे. जेहूर - ठाकूरवाडी व उंबरखेडा येथील काही शेतकरी गायरानात आपली जनावरे चरण्यासाठी घेऊन गेली होती. दरम्यान, दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. यावेळी जेहूर - ठाकूरवाडीजवळ गट नंबर ७० मधील गायरानात वीज कोसळली. यात शिवराम मेंगाळ यांचे ३ (२ गाय व वासरू), पुंजाराम मधे यांचे ८ (५ गाय ३ वासरु) व अंबादास मेंगाळ यांचा १ बैल दगावला. तर दुसऱ्या घटनेत उंबरखेडा येथील अविनाश नामदेव निकम यांच्या शेतात (गट क्र ६१) सुद्धा वीज कोसळल्याने दोन म्हशी व एक वगारु मृत झाले.