औरंगाबाद : गुलाब वादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा मराठवाड्याला जोरदार फटका बसला. सोमवारी (दि. २७) दिवसा आणि रात्री झालेल्या तुफान पावसाने विभागात अक्षरशः तांडव केले. यात दहा जणांचा बळी गेला असून, २०५ लहान-मोठी दुभती जनावरे वाहून गेली आहेत, तर २५ मालमत्तांची पडझड होऊन नुकसान झाले आहे.
जालन्यात १, परभणी २, नांदेड १, बीड ३, लातूर १, उस्मानाबादमध्ये २ अशा दहा जणांचा पावसाने बळी घेतल्याची प्राथमिक नोंद विभागीय पातळीवर घेण्यात आली आहे. मराठवाड्यातील ११ पैकी १० मोठ्या प्रकल्पातून सुमारे दोन लाख ६५ हजार ७८६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.१०० मि.मी.च्या पुढे ढगफुटीसारखा पाऊस गृहीत धरला जातो. सोमवारी रात्री विभागातील सुमारे १८२ सर्कलमध्ये ६५ मिमीच्या पुढे पावसाची नोंद झाली. यात ६०हून अधिक मंडळात ढगफुटीसारखी तुलना होईल, असा पाऊस झाला आहे. १० सप्टेंबरपर्यंत १५ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होेते. २५ सप्टेंबरपर्यंत नुकसानीचा आकडा २० लाख हेक्टरवर गेला असून, २८ रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे हा आकडा २५ लाख हेक्टरच्या पुढे जाण्याची शक्यता विभागीय प्रशासनाने वर्तविली आहे. २८ रोजी सकाळपासून पूर्ण जिल्हानिहाय यंत्रणा मदतकार्यात जुंपलेली होती. त्यामुळे वादळाच्या परिणामाचा तक्ता पुढील दोन दिवसांत समोर येईल.
काही तासांत ७० मि.मी. पाऊस; आजवर एक हजार मि.मी. पाऊसमराठवाड्यात भूतो न भविष्यती याप्रमाणे काही तासांत ७० मि.मी. पावसाची नोंद झाली. यात सर्वाधिक ९० मि.मी. पाऊस नांदेड जिल्ह्यात नोंदविला गेला. औरंगाबाद जिल्ह्यात ४१.६ मि.मी., जालना ४७.९, बीड ६५.६, लातूर ६६.९, उस्मानाबाद ५७.२, परभणी ४४, तर हिंगोली जिल्ह्यात ६५.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात आजवर एक हजार मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत १५० टक्के पाऊस झाला आहे. यात ५० टक्के अतिरिक्त पाऊस झाला.