घाटनांद्रासह धारला, चारनेर परिसरात यावर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नगदी पैसा मिळवून देणाऱ्या कपाशी व त्याचबरोबर मका, उडीद, सोयाबीन, बाजरी, मूग, अद्रक या पारंपरिक पिकांचीही लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. सध्या परिसरात काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी वर्ग शेतीच्या कामामध्ये गुंतले आहेत. पिकांच्या वाढीसाठी आपल्या सर्जा राजाच्या मदतीने शेतकरी वर्ग पिकांची कोळपणी करीत आहेत. तसेच कोरोनामुळे शाळांना सुट्या असल्याने बच्चे कंपनीदेखील शेतीच्या कामात हातभार लावताना दिसत आहेत.
परिसरात परराज्यातून मजूरवर्ग येत असल्याने दरवर्षी येथे मजुरांची वानवा जाणवत नव्हती; मात्र कोरोनामुळे सध्या परराज्यातील मजूर परतले नाहीत, यामुळे मागील वर्षीपासून परिसरात मजुरांची वानवा जाणवत आहे. यामुळे आसपासच्या गावांमध्ये मजुरांसाठी चकरा माराव्या लागत आहेत. मजूर मिळत नसल्याने बहुतांशजण कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने शेतीची कामे उरकत आहेत. जे मजूर येतात त्यांनाही वाढीव मोबदला द्यावा लागत असल्याने आर्थिक फटका बसत असल्याची माहिती शेतकरी कृष्णा पवार, अमोल चौधरी, बाबासाहेब मोरे, रखमाजी मोरे आदी शेतकऱ्यांनी दिली.
फोटो : घाटनांद्रा शिवारात निंदनीची कामे करताना शेतकरी महिला, मजूर.
050721\05_2_abd_28_05072021_1.jpg
घाटनांद्रा शिवारात निदणीची कामे करताना शेतकरी महिला, मजूर.