संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटर, आयसीयू बेडवर , ऑक्सिजन बेडवर ठेवलेले दृश्य पहायला मिळते, परंतु अलीकडे रुग्णालयातील एका गोष्टीने अनेकांचे लक्ष वेधले आहे. अनेक कोरोनाग्रस्त पोटावर झोपलेले दिसतात. असे का, असा प्रश्न नातेवाईकांकडून उपस्थित होतो. परंतु अशाप्रकारे पालथे झोपण्याने ऑक्सिजन पातळी वाढण्यास मदत होते. सामान्य प्रकृती, पण ऑक्सिजन पातळी कमी झालेले रुग्णालयातील, होम आयसोलेशनमधील रुग्णांसाठी हे लाभदायक ठरत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.
पालथे, पाेटावर झोपण्यास वैद्यकीय भाषेत ‘प्रोन’ म्हणतात. कोरोना रुग्णाच्या फुप्फुसात पाणी झाले असेल आणि त्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत असेल तर अशा रुग्णांना काही तास अशा पद्धतीने पोटावर झोपण्याचा सल्ला दिला जातो. शहरातील रुग्णालयांत अनेक कोरोनाग्रस्तांना सध्या अशा पद्धतीने झोपण्यास सांगितले जात आहे. अनेकदा ऑक्सिजन देऊनही फायदा होत नाही. पण अशा पद्धतीने झोपल्याने रुग्णांचे फुप्फुस प्रसरण पावते. फुप्फुसाचा सर्वांत जड भाग खालच्या बाजूला असतो. त्यामुळे रुग्ण जेव्हा पाठीवर झोपतो त्यावेळी शरीराचे सगळे वजन पाठीवर पडते. त्यातून रुग्णाला पुरेशा प्रमाणात हवा आत घ्यायला त्रास होतो. पण रुग्णाला पालथे झोपविल्यास फायदा होतो. त्याबरोबर झोपण्यासंदर्भात अन्य काही पद्धतीही परिणामकारक ठरत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
-----
जिल्ह्यातील एकूण रुग्ण- १,२६,९७७
रुग्णालयात सध्या उपचार घेत असलेले रुग्ण-१०,३००
गृह विलगीकरणातील रुग्ण-१२१०
--------
अशी वाढवा ऑक्सिजन पातळी
प्रकृती गंभीर नसलेल्या, पण ऑक्सिजन कमी असलेल्या रुग्णांना पालथे झोपण्याचा फायदा होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले. रुग्णांनी अर्धा ते दोन तास पालथे झोपावे. त्यानंतर उजव्या बाजूने आणि डाव्या बाजूने प्रत्येकी दोन तास झोपावे. त्यानंतर ६० ते ९० अंशात म्हणजे आराम खुर्चीत जसे बसतो, तसे बसावे. यातून ऑक्सिजन पातळी वाढीला मदत होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
----
....तर पालथे झोपू नये
गरोदर महिलांनी अशा प्रकारे पोटावर झोपता कामा नये. कारण त्यातून गर्भातील बाळावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबरोबर लठ्ठ व्यक्तींनीही पालथे झोपण्याचे टाळले पाहिजे. अशाप्रकारे झोपणे ते सहन करू शकत नाही. त्याबरोबर ज्यांची ऑक्सिजन पातळी सामान्य आहे, त्यांनीही असे झोपता कामा नये. ऑक्सिजनची पातळी अधिक वाढणे, हेदेखील शरीरासाठी अपायकारक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
------
पालथे झोपण्याचा फायदा
पालथे झोपण्याचा रुग्णांना निश्चितच फायदा होतो. जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांना अशा प्रकारे झोपण्याचा सल्ला दिला जातो. पण सर्वच रुग्णांनी अशाप्रकारे करणे योग्य नाही. कारण अनेकांची प्रकृती गंभीर असते. व्हेंटिलेटरवर असतात. त्यांना असे करता येत नाही. ज्यांची ऑक्सिजन पातळी ९० पर्यंत आहे, त्यांना फायदा होऊ शकतो.
-डाॅ. कमलाकर मुदखेडकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक
----
सामान्य व्यक्तींनी टाळावे
कोरोना रुग्णाच्या फुप्फुसात पाणी झाले असेल आणि त्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत असेल तर अशा रुग्णांना दोन तास अशा पद्धतीने पोटावर झोपवता येते. त्यानंतर हाताच्या उजव्या बाजूने, डाव्या बाजूने प्रत्येकी दोन तास झोपले पाहिजे. नंतर ६० ते ९० अंशात बसले पाहिजे. या चारही बाबी दोन दोन तास केल्या पाहिजे. ऑक्सिजन पातळी वाढविण्यासाठी त्याचा फायदा होतो. ज्यांचे फुप्फुस चांगले आहे, म्हणजे सामान्य व्यक्तींनी असे करण्याची गरज नाही.
-डाॅ. गजानन सुरवाडे, सहयोगी प्राध्यापक, मेडिसीन विभाग, घाटी
---------