ना नियोजन ना तयारी;महापालिका निवडणुक तोंडावर असताना काँग्रेसमध्ये सुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 01:25 PM2020-03-03T13:25:59+5:302020-03-03T13:30:20+5:30
अन्य राजकीय पक्षांचा औरंगाबादचा संपर्क वाढला, पण काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा अद्याप पत्ताच नाही.
- स. सो. खंडाळकर
औरंगाबाद : मनपा निवडणुकीच्या दृष्टीने गांधी भवनातील छोट्या- मोठ्या बैठका सोडल्या तर काँग्रेसमध्ये अद्यापही सुस्तीच दिसून येत आहे. सर्वच्या सर्व जागा लढवू अशा वल्गना करणे सोपे. परंतु प्रत्यक्षात तशी तयारीही असणे गरजेचे आहे. महाविकास आघाडीची सत्ता आली आणि काँग्रेसचे प्रदेशचे नेते मंत्रीपदाच्या कामांमध्ये व्यस्त होऊन गेले. परिणामी अन्य राजकीय पक्षांचा औरंगाबादचा संपर्क वाढला, पण काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा अद्याप पत्ताच नाही.
तीन निरीक्षकांच्या उपस्थितीत गांधी भवनात एक बैठक झाली. त्यावेळी गांधी भवन भरून गेले. एवढे कार्यकर्ते कुठून आले, असा प्रश्न पडला.
काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेशचे नेते औरंगाबाद मनपाच्या बाबतीत अधिक सतर्क झालेले दिसत आहेत. मागच्या आठवड्यात स्वत: खा. सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसांचा औरंगाबाद जिल्हा दौरा के ला. रात्री उशिरापर्यंत त्यांनी राष्ट्रवादी भवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांच्या थेट मुलाखती घेतल्या. त्याआधी राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनीही औरंगाबादचा दौरा केला होता. अगदी अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलच्या प्रदेशाध्यक्षा खा.वंदना चव्हाण आणि दुसऱ्या दिवशी लगेच राष्टÑवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी इच्छुक उमेदवारांशी चर्चा केली. पत्रपरिषदा घेऊन पक्षाची भूमिका मांडली. महाविकास आघाडीत लढण्यास राष्टÑवादी काँग्रेस तयार असल्याचे संकेत दिले. बदललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मनपा निवडणूक गांभीर्याने घेतलेली दिसते. दोनच दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मेळावा घेतला. यावेळी त्यांच्याबरोबर शिवसेना नाही. त्यामुळे शिवसेनेवर तुटून पडण्याची एकही संधी भाजप सोडताना दिसत नाही. हिंदू मते आकर्षित करण्यासाठी शहराच्या संभाजीनगर नामकरणाचा मुद्दा भाजपने जोरदारपणे मांडायला सुरुवात केलेली आहे.
मनसेने झेंडा बदलल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदा औरंगाबादला आले. प्रतिसाद समाधानकारक नसल्याचे दिसताच दौरा अर्धवट सोडला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांचे औरंगाबादकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. जिल्ह्यात खासदार तर नाहीच नाही, पण एकही आमदार नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी औरंगाबाद पूर्व व पश्चिम मतदारसंघात काँग्रेसला उमेदवारही देता आला नव्हता. एवढी दारुण परिस्थिती होऊन अनेकांनी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईची कुठलीही शक्यता नसल्याने एक समाजघटक प्रचंड नाराज तर आहेच. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुभाष झांबड यांनी जणू पक्षातूनच अंग काढून घेतले की काय, अशी परिस्थिती आहे. काँग्रेसकडे स्थानिक समर्थ नेता नसल्यानेही मोठी पोकळी निर्माण झालेली बघावयास मिळत आहे.
पर्याय काय : कार्यकर्ते द्विधा मन:स्थितीत
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष अशोक चव्हाण व औरंगाबादचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्त झालेले अमित देशमुख यांची औरंगाबादचे काँग्रेसजन प्रतीक्षा करीत आहेत. संपर्कमंत्री झाल्यापासून अमित देशमुख एकदाही औरंगाबादला आले नाहीत. काही प्रमुख कार्यकर्त्यांना मुंबईला बोलावून बाळासाहेब थोरात यांनी एक बैठक घेतली. मध्यंतरी संपतकुमार यांनी शिवसेनेवर तूर्त टीका करू नका, असा सल्ला दिला. सर्वच्या सर्व जागा लढण्यासारखी परिस्थिती नसली तरी महाविकास आघाडीबाबतही नक्की धोरण पुढे येत नसल्याने काँग्रेस बुचकळ्यात पडली आहे, असे दिसते.