औरंगाबाद : सर्वच्या सर्व जागा स्वबळावार लढवण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसकडे इच्छुकांची भाऊगर्दी होताना दिसत नाही. उमेदवारी अर्ज भरण्यास इच्छुक उमेदवार संथ प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. ती मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहील, असे शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून पक्षकार्यालय गांधी भवन व शहराध्यक्ष पवार यांचे निराला बाजार येथील कार्यालय येथे उमेदवारी अर्जांचे वाटप सुरू आहे. आतापर्यंत शंभर उमेदवारी अर्ज आल्याचे सांगत हळूहळू हे अर्ज वाढतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव संपतकुमार यांनी गांधी भवनातील बैठकीत स्पष्ट केले होते की, महाविकास आघाडी करायची वा नाही, याचा निर्णय होईपर्यंत शिवसेनेवर टीका करू नका. राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस या तीन पक्षांची सत्ता आहे. त्यामुळे टीका टाळा.
मागच्या शनिवारी पक्षाने पाठवलेल्या तीन निरीक्षकांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. निवडणुकीच्या काळात गांधी भवनात नेहमीच गर्दी होत असते. तशी यावेळीही होत आहे. एकेका वॉर्डातून उमेदवारी मागणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्याही मोठी नाही. एक-एक किंवा दोन-दोन अर्ज आतापर्यंत आले आहेत. महाविकास आघाडी करण्यासंदर्भात ठोस निर्णय न झाल्यामुळे सर्व वॉर्डांची तयारी करून ठेवणे गरजेचे असल्याने त्या दिशेने काँग्रेसची पावले पडत आहेत.