पैठण : कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कापूस विक्री करण्यासाठी नोंदणी करणाऱ्या पैठण तालुक्यातील ११७३ शेतकऱ्यांनी कापूस खाजगी व्यापाऱ्यांना विक्री केला असल्याची माहिती कापूस पडताळणी मोहिमेतून समोर आली आहे.
पावसाचे झालेले आगमन व शासकीय कापूस खरेदीची संथगती लक्षात घेता कापूस घरात ठेवण्याचा धोका न पत्करता खाजगी व्यापाऱ्याच्या पारड्यात कापसाचे माप टाकून बळिराजा मोकळा झाला आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या आदेशानुसार पैठण तालुक्यात करण्यात आलेल्या कापूस पडताळणी मोहिमे अंती आता फक्त ७२६ शेतकऱ्यांचा २५२६८ क्विंटल कापसाची खरेदी शिल्लक राहिली आहे.
पैठण कृषि उत्पन्न बाजार समितीकडे एकूण ४२३० शेतकऱ्यांनी कापूस विक्री साठी नोंदणी केलेली आहे . त्यापैकी कापूस विक्री केलेल्या तसेच दुबार नोंदणी केलेल्या १२८१ शेतकऱ्यांची संख्या वजा जाता पैठण तालुक्यातील १८९९ शेतकऱ्यांकडील शिल्लक कापसाची प्रत्यक्ष गावात जावून १ ते ७ जून दरम्यान ग्रामसेवक , तलाठी तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सचिव आदीच्या पथकाने पडताळणी केली. या पडताळणीत तब्बल ११७३ शेतकऱ्यांनी आपला कापूस खाजगी व्यापाऱ्यांना विकल्याचे समोर आले आहे.
१०५० शेतकरी ईतर तालुक्यातीलपैठण बाजार समितीकडे नोंदणी केलेल्या इतर तालुक्यातील १०५० शेतकऱ्यांच्या यादया संबंधित तालुक्याकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. १८९९ शेतकऱ्यांपैकी ११७ शेतकऱ्यांकडे कापूस तपासणी तारखेवर शिल्लक नसल्याने सदर शेतकऱ्यांची नांवे वगळण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले. शासनाच्या कापूस पडताळणी मोहिमेमुळे शेतकऱ्यांच्या नावावर उखळ पांढरे करून घेण्याऱ्या व्यापाऱ्यांना चांगलाच धडा मिळाला आहे. उर्वरित कापूस खरेदी शासनाचे पुढील आदेश येताच सुरू करण्यात येईल असे तहसीलदार यांनी सांगितले.