विद्यार्थी, प्राध्यापक हळहळले : घाटीत श्रद्धांजली अर्पण
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) एमबीबीएस द्वितीय वर्षातील विद्यार्थी यश गंगापूरकर हा अतिशय होतकरू आणि हुशार विद्यार्थी होता. आपल्या पुढच्या वर्गातील विद्यार्थ्यांनाही तो शिकवत असे. त्याच्या जाण्याने शनिवारी घाटीत विद्यार्थी, प्राध्यापकांनी हळहळ व्यक्त केली.
यशच्या मृत्यूची माहिती कळताच घाटीत काही वेळेसाठी कोणालाही विश्वास बसत नव्हता. विष प्राशन केल्यानंतर त्याचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. महाविद्यालयात प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी त्याला श्रद्धांजली अर्पण करीत आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे, डॉ. भारत सोनवणे, डॉ. सुधीर चौधरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. प्रसाद कुलकर्णी, डॉ. ज्योती बजाज-इरावणे, डॉ. राजश्री सोनवणे, आदी उपस्थित होते. यश कधीही तणावात दिसला नाही. तो असे काही करेल, अशी पुसटशीही कल्पना नव्हती, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
ताण घेऊ नका...
विद्यार्थ्यांनी कोणत्याही गोष्टीचा ताण घेता कामा नये. जी व्यक्ती योग्य वाटते, त्याच्याजवळ मनातले बोलले पाहिजे. छंद जोपासावा, असे आवाहन श्रद्धांजलीप्रसंगी उपस्थित प्राध्यापक, डॉक्टरांनी केले.
गतवर्षीच्या घटनेची आठवण
२०२०च्या सुरुवातीला घाटीत कार्यरत असलेल्या एका तरुण डॉक्टरने आत्महत्या केली होती. इंजेक्शनद्वारे शरीरात विषारी रसायन घेत डॉ. शेषाद्री गौडा यांनी आत्महत्या केली होती.