औरंगाबाद : नागरिकांना ‘स्मार्ट सिटीझन’करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. स्मार्ट सिटीझनसाठी त्यांना प्रशिक्षित करून बॅच देण्यात येणार आहेत. भारतात पहिल्यांदाच औरंगाबाद मनपाने हाती घेतलेल्या या अभिनव उपक्रमात महात्मा गांधी मिशन (एमजीएम) हॉस्पिटल आणि औरंगाबाद फर्स्ट टीमने सहभाग घेण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.
स्मार्ट सिटी प्रकल्प राबविणे केवळ पायाभूत विकासापुरते मर्यादित नाही. नागरिकांना त्यांची सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव झाल्याशिवाय शहराची ओळख ‘स्मार्ट’होऊ शकत नाही. नागरिकांना ‘स्मार्ट’ करण्यासाठी मनपाने त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी मेगा मोहीम हाती घेतली आहे. एमजीएम मेडिकल कॉलेजचे उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी रविवारी सायंकाळी या मोहिमेच्या अंमलबजावणीविषयी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे सादरीकरण केले. औरंगाबाद फर्स्ट उमेदवारांची नोंदणी आणि एमजीएमशी समन्वय ठेवेल. एमजीएम रुग्णालय प्रशिक्षण तसेच प्रशिक्षणासाठी पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ पुरवून परीक्षा घेईल. प्रशिक्षणानंतर नागरिकांची परीक्षा घेण्यात येईल. जे उत्तीर्ण होणार नाहीत, त्यांना पुन्हा प्रशिक्षण देण्यात येईल. तर प्रशिक्षणात उत्तीर्ण झालेल्यांना मनपा प्रमाणपत्र आणि बॅच देणार आहे.
मनपा प्रशासक कोअर कमिटीचे अध्यक्षमनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय हे कोअर टीमचे प्रमुख असतील. कोअर टीममध्ये मनपा शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त अपर्णा थेटे, एएससीडीसीएलचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव आशिष गाडेकर, औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष प्रीतीश चटर्जी, उद्योजक मानसिंग पवार, रणजित कक्कड यांचा समावेश आहे.