औरंगाबाद : हर्सूल टी पॉईंटवर स्मार्ट सिटी अंतर्गत उभारलेल्या बसथांब्याची जागा चुकल्याचे म्हटले जात आहे.
मध्यवर्ती बसस्थानकातून हर्सूल टी पॉईंटमार्गे विदर्भ, खानदेश, अजिंठा लेणी आणि मराठवाड्यासाठी लांबपल्ल्याच्या बसेस सोडल्या जातात. त्यामुळे सिडको-हडकोवासीयांना हर्सूल टी पॉईंट बसथांबा जवळचा व सोयीचा आहे. याठिकाणी बाहेरगावी ये-जा करणाऱ्या प्रवाशांची कायम वर्दळ असते. स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेला बसथांबा खरंतर प्रवाशांची जेथे जास्त गर्दी असते, तेथे उभारायला हवा होता. परंतु, हा थांबा तेथे न उभारता मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर व रिक्षा स्टँडजवळ उभारल्याने तेथे रिक्षाचालक व त्यांचे सहकारी कायम बसलेले असतात. सध्या उन्हाची तीव्रता जास्त असून, बसच्या प्रतीक्षेत थांबलेल्यांना इकडे-तिकडे सावलीचा आधार शोधावा लागतो.
याठिकाणी बसथांबा व पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करण्याची मागणी शुभम तेलंग, वैभव तेलंग, डॉ. शत्रुघ्न जाधव, प्रा. अर्जुन तायडे, प्रा. अनिल लहाने, रामकृष्ण अवचार, वैभव जाधव, जनार्धन धंदर, साहेबराव पाटील, किरण भदाणे, विनीत कोकाटे, आदी प्रवाशांनी केली आहे.