औरंगाबाद : स्मार्ट सिटीतील स्मार्ट गृहप्रकल्प कसे असतील याची अनुभूती क्रेडाईच्या ‘ड्रीम होम’ प्रदर्शनात येत आहे. शहरवासीयांच्या बदलत्या राहणीमानाचा सूक्ष्म विचार करून उभारण्यात आलेल्या आधुनिक गृहप्रकल्पाने गृहेइच्छुक भारावून जात आहेत. चार दिवसांत या प्रदर्शनाला साडेतीन हजार नागरिकांनी भेट दिली हेच या आयोजनाचे फलित होय. आकाशवाणी चौकातील जुन्या बिग बाझारच्या इमारतीत ‘ड्रीम होम’ प्रदर्शन सुरूआहे. बांधकाम व्यावसायिकांची संघटना ‘क्रेडाई’ने प्रदर्शन भरविले आहे. एकाच छताखाली ७५ नामांकित बिल्डर्सच्या २५० गृहप्रकल्पांची सविस्तर माहिती येथे मिळत आहे. याशिवाय आणखी २९ स्टॉल असे आहेत की, त्यात सुलभ गृहकर्ज उपलब्ध करून देणाऱ्या देशातील दिग्गज बँकांचे १५ स्टॉल, तसेच बांधकाम साहित्यांचे १४ स्टॉल आहेत. या प्रदर्शनात गृहेइच्छुकांसाठी १० लाखांपासून ते सव्वाकोटी पर्यंतचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक बिल्डर्सने स्टॉलची आधुनिक डिझाईननुसार मांडणी केली आहे. अनेक बिल्डर्सने एलईडी टीव्ही तर काहींनी चक्क एलईडी वॉल उभे करून त्याद्वारे आपल्या गृहप्रकल्पांच्या प्रत्यक्ष साईटची व्हिडिओ शूटिंग, ग्राफिक्स दाखविले जात आहे. ग्राहकांना चालण्यासाठी मोठी जागा देण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना सहपरिवार आरामात प्रदर्शन बघता येत आहे. प्रत्येक ग्राहकाची आॅनलाईन नोंदणी व प्रोत्साहनपर योजना या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरत आहे. या प्रदर्शनात तयार गृहप्रकल्पांचीही संख्या अधिक असल्याने बुकिंग करून दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर राहण्यासाठी जाण्याचे नियोजनही अनेक ग्राहकांनी केले आहे. यामुळेच चांगली बुकिंग झाल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.ड्रीम होम प्रदर्शनाला लोकमतचे कार्यकारी संचालक करण दर्डा यांनी शनिवारी सायंकाळी भेट दिली. प्रदर्शनाच्या नियोजनबद्ध आयोजनाबद्दल त्यांनी क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांची प्रशंसा केली. तसेच प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या युवापिढीच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले. यावेळी त्यांच्यासोबत लोकमतचे सहायक उपाध्यक्ष संदीप विष्णोई यांचीही उपस्थिती होती. प्रदर्शन यशस्वीतेसाठी क्रेडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष राजेंद्रसिंग जबिंदा, प्रमोद खैरनार, क्रेडाईचे अध्यक्ष सुनील पाटील, सचिव विकास चौधरी, रवी वट्टमवार, पापालाल गोयल, बाळकृष्ण भाकरे, नितीन बगाडिया, नरेंद्रसिंग जबिंदा, अनिल मुनोत, संग्राम पटारे, भास्कर चौधरी, सुनील बेदमुथा, सचिन बोहरा, आशुतोष नावंदर, रामेश्वर भारुका, अनिल आग्रहारकर, विजय सक्करवार, मनोज पगारिया, अखिल खन्ना, गोपेश यादव आदी परिश्रम घेत आहेत.
प्रदर्शनात स्मार्ट होम सिटीची अनुभूती
By admin | Published: October 09, 2016 12:51 AM