औरंगाबाद : एखाद्या रुग्णाला छातीत वेदना होत असतील अथवा हार्ट अटॅक आला की अगोदर ईसीजी काढला जातो. त्यासाठी रुग्णालयात मोठे यंत्र हाताळण्याची कसरत करावी लागते. मंग प्रिंट काढायची, त्याचा फोटो काढून वरिष्ठांना मोबाईलवर पाठवायचा आणि मार्गदर्शन मिळताच उपचार सुरू करायचे. तोपर्यंत रुग्णाचा जीव टांगणीला लागलेला असतो. यावर उपाय म्हणून शहरातील तीन तरुणांनी अगदी खिशात मावेल आणि काही मिनिटांत मोबाईलवर रिपोर्ट देणारे स्मार्ट ईसीजी यंत्र तयार केले आहे.
प्रतीक तोडकर, मिहीर गायकवाड आणि तन्वी निकाळजे अशी या तिघा तरुणांची नावे आहेत. या तिघांनी या स्मार्ट ईसीजी यंत्राचा स्टार्टअप उद्योग सुरू केला असून, त्यातून २५ जणांना रोजगारही मिळाला आहे. तन्वी निकाळजे म्हणाली, वडिलांकडे मोबाईलवर ईसीजी प्रिंट येत असे. अनेकदा प्रिंट अस्पष्ट येत असल्याने अडचण होत असे. त्यातून ईसीजी डिव्हाईस तयार करण्याची प्रेरणा मिळाली. प्रतीक तोडकर म्हणाला, मोठ्या ईसीजी यंत्राप्रमाणेच या छोट्या डिव्हाईसद्वारे १०० अचूक ईसीजी रिपोर्ट मिळतो. एकाच वेळी १० ठिकाणांहून ईसीजी रिपोर्ट येऊन तज्ज्ञांना मार्गदर्शन करता येईल, अशी सुविधा मोबाईलच्या माध्यमातून दिली आहे. डाॅ. आनंद निकाळजे, डाॅ. विजय गायकवाड, डाॅ. शशिकांत अहंकारी, डाॅ. अशोक बेलखोडे यांनी मार्गदर्शन केल्याचे या तरुणांनी सांगितले.
तंत्रज्ञानाची जोड ही काळाची गरज : आरोग्यमंत्रीया तरुणांनी सुरू केलेल्या स्टार्टअप कंपनीचे रविवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आणि हृदयरोगतज्ज्ञ डाॅ. अजित भागवत यांच्या हस्ते ईसीजी यंत्राचे उद्घाटन झाले. याप्रसंगी उद्योजक सुनील रायठठ्ठा, सुरेश तोडकर, विवेक पवार यांच्यासह उद्योग, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. बायोमेडिकल इंजिनिअर क्षेत्र वैद्यकीय क्षेत्राबरोबर चालणे, वैद्यकीय क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड ही काळाची गरज असल्याचे यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.