वाळूज महानगर : वाळूज महानगरात चोरट्यांनी एकाच रात्रीत बंद घर व मेडिकल दुकान फोडून सोने-चांदीच्या दागिण्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि.३) सकाळी उघडकीस आली. मेडिकलमधून दहा ते बारा हजार रुपयांची रोकड चोरीला गेली आहे. तर दुसऱ्या घटनेतील नेमका किती ऐवज गेला हे कळू शकले नाही.
दरम्यान, चोरीच्या वाढत्या घटनांमुळे भितीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
संतोष नारायण कुंटे (४५) यांचे बजाजनगरात मेडिकल दुकान असून, येथेच वरच्या मजल्यावर ते कुटुंबासह राहतात. सोमवारी (दि.२) रात्री १२ वाजेच्या सुमारास कुंटे दुकान बंद करुन घरी गेले. दरम्यान, चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील रोख रक्कम चोरुन नेली.
सकाळी ६:३० वाजेच्या दरम्यान सफाई कामगार त्रिजगत फतांडे याला हा प्रकार दिसून आला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात घटनेची माहिती घेतली. यावेळी कुंटे यांनी दुकानात पहाणी केली असता गल्यातील १० ते १२ हजार रुपये गायब असल्याचे दिसून आले. अन्य कुठलेही साहित्य चोरीला गेले नसल्याने त्यांनी सांगितले.
तर दुसºया एका घटनेत चोरट्यांनी सिडको वाळूज महानगर येथील एका अभियंत्याचे बंद घराचे कुलूप तोडून सोने-चांदीच्या दागिण्यासह काही रक्कम लंपास केली. सुधीरसिंग राजपूत (रा. पटणा, बिहार) हे वाळूज एमआयडीसीत एका कंपनीत अभियंता म्हणून काम करतात.
सिडको वाळूज महानगर १ येथे ते किरायाने राहतात. आईची प्रकृती ठीक नसल्याने ते कुटुंबासह ३१ आॅगस्ट रोजी मूळ गावी गेले आहेत. दरम्यान, चोरट्यांनी सोमवारी रात्री कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोने-चांदीचे दागिने व काही रक्कम चोरुन नेली. दरम्यान, मंगळवारी सकाळी ही बाब घरमालकाच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली.
पोलिसांनी घटनेची माहिती घेतली. राजपूत हे गावी असल्याने त्यांच्या घरातून नेमके किती सोने-चांदी व रक्कम गेली याची माहिती मिळू शकली नाही. या दोन्ही चोऱ्यांप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्रली उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.