लोकमत न्यूज नेटवर्कबनोटी : सोयगाव तालुक्यातील बनोटी येथे रविवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालून एकाच रात्री मुख्य रस्त्यावरील सहा दुकाने फोडल्याने व्यापारी व गावक-यांत घबराट निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यापासून जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्याने या चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. शनिवारी रात्रीही चिंचोली लिंबाजी व पैठण येथे चोरट्यांनी सलामी दिली होती. दुसºया दिवशी पुन्हा बनोटीत अशीच घटना घडल्याने ग्रामस्थांनी पोलिसांच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.बनोटीतील चोरीच्या घटनेत २० हजार दोनशे रुपये रोख रक्कमेसह मुद्देमाल, एक मोटारसायकल चोरट्यांनी लंपास केली. मकर संक्रांतीच्या मध्यरात्री बनोटी गावातील मुख्य रस्त्यावरील गावाच्या मध्यभागी असलेल्या बिअर बारचा कडीकोंडा तोडून दहा बिअरच्या बाटल्या चोरी गेल्या. तर जिल्हा परिषद शाळेबाहेरील समाधान पाटील यांचे किराणा व जनरल दुकान, विनोद सुरळे यांच्या प्रोव्हीजनचे शटर उचकटून रोख रकमेसह किराणा माल चोरट्यांनी लंपास केला. यानंतर संभाजी चौकातील समर्थ आॅटो स्पेअरपार्ट अॅण्ड टायर दुकानाचे शटर तोडून चौदा हजार तीनशे रुपये रोख लंपास करुन मालाची नासधूस केली. तसेच वनरक्षक गणेश दांगोडे यांच्या मालकीची हिरो होंडा कंपनीची मोटारसायकलही (एम. एच -२१-एएफ -७०१२) चोरट्यांनी लांबविली. एकाच रात्री सहा दुकानांचे शटर तोडून धाडसी चोरीची घटना प्रथमच घडल्याने व्यापारी वर्गात व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेच ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक सुजीत बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जी.ए. जागडे, पो.कॉ. योगेश झाल्टे, सतीश पाटील, दीपक पाटील तपास करीत आहेत.महिनाभरापासून चोºयांची मालिकागेल्या महिनाभरात जिल्ह्यातील आडूळ जैन मंदिरासह लासूर स्टेशन, पैठण, चिंचोली लिंबाजी, टेंभापुरी, जातेगाव, बाबरा आदी ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घालून लाखो रुपयांचा ऐवज चोरुन नेला. यापैकी एकाही चोरीचा तपास अद्याप लागलेला नसताना चोºयांची मालिका सुरुच असल्याचे दिसत आहे.पैठण शहरात आठवडाभरात तीन चोºया झाल्याने भयभीत झालेले व्यापारी रविवारी पोलिस ठाण्यात गेले असता तेथील अधिकाºयांनी दिलासा न देता अरेरावी केल्याने शहरातील नागरिकांमध्ये पोलिसांप्रती नाराजी वाढली आहे. याशिवाय जिल्ह्यात भुरट्या चोºयाही वाढल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत.
जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:10 AM