औरंगाबाद : रेमडेसिविर इंजेक्शन हवे असल्यास निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्याशी संपर्क साधावा, असा एसएमएस सोशल मीडियातून फिरत असून, तो चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे. हे इंजेक्शन मागणीनुसार जिल्हा प्रशासन, अन्न व औषधी प्रशासन आणि घाटी प्रशासनाच्या समन्वयातूनच वितरित केले जात आहे. इतरत्र हे इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे स्पष्टीकरणही देण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनासोबत आज बैठक
औरंगाबाद : कोरोना नियंत्रणाबाबत जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात सोमवारी सकाळी ११ वाजता मुख्य सभागृहात बैठक होणार आहे. महिन्याभरापासून या बैठका होत आहेत.
नऊ दुकानांविरोधात सिटीचौक ठाण्यात गुन्हा
औरंगाबाद : कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशाने व कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ९ मे रोजी नऊ आस्थापनांविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्या आस्थापना सील करण्यात आले आहेत. या पथकात कामगार उपायुक्त कार्यालयातील सरकारी कामगार अधिकारी रोहन रुमाले, अमोल जाधव, दुकाने निरीक्षक गोविंद गावंडे, विठ्ठल वैद्य, महेंद्र अंकुश होते. मनपाचे वॉर्ड अधिकारी प्रकाश आठवले, सलमान काझी, अलीम शेख ,सय्यद अफझल, आदींचा समावेश होता.