लोकमत न्यूज नेटवर्कपालम : तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसावर बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. मात्र या पिकांवर गोगलगायींचा उपद्रव वाढला आहे. निघालेले अंकूर गोगलगाय फस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.तब्बल एक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पालम तालुक्यात पाऊस झाला. साधारण झालेल्या पावसावर खरीपाच्या पेरण्यास शेतकऱ्यांनी सुरूवात केली. निम्या क्षेत्रावरील पेरणी आटोपली आहे. पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना आता मात्र गोगलगायीच्या उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे. गोगलगायी शेतकऱ्यांना सळो की, पळो करून सोडत आहे. पेरणी झाल्यानंतर उगवलेले सोयाबिनचे अंकूर बाहेर पडताच गोगलगाय व तेलण्या कीड फस्त करीत आहेत. त्यामुळे पेरणीत तुटीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. शेतकरी गोगलगायीचा नायनाट करण्यासाठी विविध प्रकारची किटकनाशके वापरीत आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
गोगलगायींचा उपद्रव वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:30 AM