साहेबराव हिवराळे
औरंगाबाद: भारतीय संस्कृतीमध्ये सापाला दैवत तसेच समृद्धीचे प्रतीक मानले जाते. म्हणून ‘नागपंचमी’ या सणाच्या दिवशी स्रिया प्रत्यक्ष नागाला नव्हे तर त्याची प्रतिकृतीची तसेच वारुळाची पूजा करतात. या दिवशी दूध आणि लाह्यांचे नैवद्य त्या वारुळाजवळ ठेवले जाते. चुकूनही दूध पाजू नका, हळद-कुंकू वाहू नका कारण त्याचा सापाच्या शरीरावर परिणाम होतो.
भीती व भक्तीच्या स्वरूपात सापाला पुजले जात असताना दुसरीकडे मात्र साप दिसला की त्याला ठार केले जाते. नागपंचमीला मानव केवळ भीतीपोटी सापाची पूजा करीत आला आहे. याचे कारण काल्पनिक चित्रपट, सापांविषयीचे गैरसमज आणि गारुड्याच्या भाकडकथा आणि खेळ. यामुळे मानवाला सुरुवातीपासूनच सापाची भीती वाटत आली आहे. यामुळे संधी दिसताच सापाला ठार मारले जाते. नागरिक नंतर हे विसरुन जातात की नागपंचमीला आपण ज्याची भक्तिभावाने पूजा केली आहे, त्यालाच नंतर ठार करतोय. कोणताच साप हा विनाकारण चावा घेत नाही, याची माहिती सर्वांना असणे गरजेचे आहे.
साप हा तर शेतकऱ्यांचा मित्र...
खरेतर कोणताच साप दूध प्राशन करत नाही. कारण सर्व सापांचा आहार हा मांसाहारी असल्याने उंदीर, बेडूक, पाली, सरडे, पक्षी इत्यादी प्राणी-पक्षी ते अन्न म्हणून घेतात. शेतीमालाचे नुकसान करणाऱ्या जीवजंतूला तो संपवून शेतकऱ्याची मदतच करतो, असे वन्यजिव अभ्यासक आदी गुडे आणि श्रीकांत वाहुळे यांनी सांगितले.
साप आढळला तर...
भारतात दरवर्षी किमान ५० हजार लोक हे केवळ सर्पदंशाने मृत्युमुखी पडत आहेत. सापांच्या विषापासूनच प्रतिसर्प विष बनविले जाते आणि हेच विष एकमेव सर्प दंशावर उपचार म्हणून ओळखल्या जाते. असेच सर्प आपण मारून संपवले तर आपल्या येणाऱ्या पिढीला साप हा केवळ पुस्तकातच बघायला शिल्लक राहील. परिसरात‘साप’ निघाल्यास त्याला तर अनुभवी सर्पमित्रांशी संपर्क साधून त्याचा जीव वाचवला पाहिजे.
जिल्ह्यात आढळणारे सापाचे प्रकार...
विषारी साप : प्रमुख चार विषारी साप. जसे : नाग, मण्यार, घोणस, फुरसे.
विना विषारी साप : तस्कर, मांडूळ, धामण, अजगर, डुरक्या घोणस, गवत्या साप, कुकरी.
सर्पमित्र काय म्हणतात...
सापाला दूध पाजू नका, त्याचा खेळ मांडू नका, तो शेतकऱ्यांचा मित्र असून, पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी उपयुक्त सरपटणारा प्राणी आहे. साप दिसताच सर्पमित्रांना फोन करून सांगावे.
- संघानंद शिंदे, भीमराव चव्हाण (सर्पमित्र)