छत्रपती संभाजीनगर : सरकारी रुग्णालयातही हेअर ट्रान्स प्लांट होऊ शकते. मात्र, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, भूलतज्ज्ञ, मनुष्यबळ, रिकव्हरिंग रुम आदींअभावी सरकारी रुग्णालय हेअर ट्रान्स प्लांट करू शकत नसल्याची परिस्थिती आहे. शिवाय हेअर ट्रान्स प्लांट करणे बंधनकारकही नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अभ्यासक्रमापुरतेच हेअर ट्रान्स प्लांट उरले आहे. ही परिस्थिती आहे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील.
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात दंतोपचारासह हेअर ट्रान्स प्लांटही शक्य आहे. अभ्यासक्रमात हेअर ट्रान्स प्लांटचा समावेश आहे. मात्र, या अभ्यासक्रमाचा सरकारी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना अजून तरी फायदा होत नाही. त्यामुळे आजघडीला त्यासाठी खासगी रुग्णालयांशिवाय पर्याय नाही. त्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात.
कसे केले जाते केस प्रत्यारोपण?टक्कल पडलेल्या लोकांसाठी केस प्रत्यारोपण एक जीवन बदलणारे पाऊल ठरू शकते. ही एक सर्जिकल प्रक्रिया आहे. ज्यामध्ये शरीराच्या इतर भागांतून केस काढून टक्कल पडलेल्या भागात प्रत्यारोपण केले जाते.
‘डेंटल’मध्ये किती तज्ज्ञ?शासकीय दंत महाविद्यालयात हेअर ट्रान्स प्लांट करू शकणारे एक प्राध्यापक, दोन सहयोगी प्राध्यापक आणि ३ लेक्चरर आहेत, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
खासगीत किती पैसे?हेअर ट्रान्स प्लांट करताना १८०० ते २००० केसांचे ग्राफ्टिंग करायला सुमारे ५ ते ७ तास लागतात. हेअर ट्रान्स प्लांट करण्याचा कमीत कमी खर्च ५० ते ६० हजार रुपये येत असल्याचे सांगण्यात येते.
...तर सरकारी रुग्णालयात किती खर्च?शासकीय दंत महाविद्यालयात हेअर ट्रान्स प्लांटची सुविधा सुरू झाली तर खासगी रुग्णालयांच्या तुलनेत ही सुविधा स्वस्तात असेल.
घाटीच्या ‘ओटी’त अत्यावश्यक उपचारशासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय आठवड्यातून एक दिवस घाटी रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरचा वापर करते. फ्रॅक्चरसह अत्यावश्यक उपचारासाठी हे ऑपरेशन थिएटर वापरले जाते. घाटी रुग्णालयाच्या थिएटरचा वापर करूनही हेअर ट्रान्स प्लांट सुरू करणे शक्य असल्याचे सांगितले जाते.
पाठपुरावा सुरूशासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात ऑपरेशन थिएटर आहे. या ऑपरेशन थिएटरसाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर, स्टाफ, भूलतज्ज्ञ मिळाले तर हेअर ट्रान्स प्लांट होऊ शकते. त्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. ‘डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया’चा अभ्यासक्रम आहे. परंतु हेअर ट्रान्स प्लांट करावेच, असे बंधन नाही.-डाॅ. माया इंदूरकर, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय------