छत्रपती संभाजीनगर : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशाच्या लग्नात जी व्हीव्हीआयपी एक्सक्ल्यूझिव्ह बॉक्स कार्ड लग्नपत्रिका तयार करण्यात आली होती त्या राजेशाही लग्नपत्रिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. आता लग्नसराईत त्यासारख्याच ‘राजेशाही पत्रिकेची’ क्रेझ आली आहे. प्रत्यक्षात अशा शाही लग्नपत्रिका हातात पडताच सर्वांच्या मुखी ‘सो ब्युटिफूल, सो एलिगंट... जस्ट लुकिंग लाइक वॉव’ असेच शब्द बाहेर पडत आहेत.
‘फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन’ असे म्हटले जाते. त्याची सत्यता सध्या लग्नसराईत येत आहे. आपल्या मुलामुलीचे लग्न अविस्मरणीय व्हावे यासाठी नवश्रीमंत, उच्च श्रीमंत कुटुंबीय प्रयत्नशील आहेत. राजेशाही लग्नाची भव्यदिव्यता लक्षात यावी, यासाठी लग्नपत्रिकाही तशीच राजेशाही बनविली जात आहे. अशा एका पत्रिकेसाठी तीन हजारपेक्षा अधिक किंमत मोजण्यास वधू-वर पिता तयार आहेत.
राजेशाही लग्नपत्रिकेची वैशिष्ट्ये‘व्हीव्हीआयपी एक्सक्ल्यूझिव्ह बॉक्स कार्ड’ असे या लग्नपत्रिकेचे नाव आहे. या पत्रिकेचा बॉक्स १२ इंच रुंद व १४ इंच उंच आहे. यावर राजेशाही महलातील खिडक्यांच्या जाळीसारखा लूक देण्यात आला आहे. या बॉक्सला लॉक आहे. ते उघडले की, दोन्ही बाजूने पत्रिका उघडते. तेव्हा पत्रिकेचा आकार २८ इंच रुंद व १४ इंच उंच एवढा होतो. तो नॅनोस्टेजसारखा असतो. त्यात मध्यभागी गणपतीची मूर्ती आणि त्याच्या आजूबाजूला मोरपंख, समोरील बाजूस शहनाई वादक दिसतात. बॉक्स उघडताच काही पत्रिकेतून ‘शहनाई’चा आवाज तर काही पत्रिकेतून ‘गायत्री मंत्र’ ऐकायला मिळतो. खालील बाजूस आणखी एक बॉक्स असतो. त्यातील कप्पा समोर केल्यावर त्यात एक आणखी पत्रिकेवर सुंदर गणपतीचे छायाचित्र दिसते. त्याखाली लग्नपत्रिका व त्याच्या खाली सुकामेवा ठेवण्यासाठीचे दोन बॉक्स असतात.
मेट्रोसिटीतून बनवून आणली जाते पत्रिकाराजेशाही थाटातील लग्नपत्रिका दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता या मेट्रोसिटीतून बनवून आणली जाते.
वधू-वरांच्या पसंतीनुसार बनविली जाते पत्रिकालग्नसोहळ्याचे कॉन्ट्रॅक्ट इव्हेंट कंपनीकडे दिले जात असले तरी पत्रिका मात्र, वधूवर स्वत:च्या पसंतीनुसार तयार करून घेत आहेत. अशा राजेशाही पत्रिका खास बनवून घेतल्या जातात. त्यासाठी जास्तीचे पैसे मोजण्याची तयारी असते.
डेस्टिनेशन वेंडिंगमध्ये राजेशाही पत्रिकाराजेशाही पत्रिका बनविणारी ५ टक्के कुटुंबे आहेत. जी डेस्टिनेशन वेंडिंग करीत असतात. श्रीमंत कुटुंबातील लग्न आता मोजक्याच वऱ्हाडींना घेऊन शहराबाहेर शिर्डी, लोणावळा, गोवा, जयपूर, उदयपूर किंवा बँकॉक येथे जाऊन लग्न लावतात व शहरात येऊन रिसेप्शन देतात. त्यांच्या कल्पकतेनुसार लग्नपत्रिका बनवून दिली जाते. अशा पत्रिका बनविण्यासाठी ३ ते ४ आठवडे लागतात.- आदेशपालसिंग छाबडा, अध्यक्ष, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्स