छत्रपती संभाजीनगर : राज्य उत्पादन शुल्ककडे तक्रारी करून वाइन शॉपचालकाला ब्लॅकमेलिंग करणारा तथाकथित आरटीआय कार्यकर्ता ५० हजारांची खंडणी घेताना रंगेहाथ पकडला गेला. सुनील भुजंग औचरमल (रा. मारोतीनगर, मयूर पार्क) असे त्याचे नाव असून, चिकलठाणा पोलिसांनी त्यास अटक केली.
राजू मनकानी यांचे वरुड काझी परिसरात वाइन शॉप आहे. १२ जुलै रोजी सुनीलने त्यांच्या दुकानाच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार केली. त्याचा आधार घेत मनकानी यांना ब्लॅकमेलिंग सुरू केली. कॅनॉट प्लेस परिसरात बोलावून तुझे वाइन शॉप बंद करेन, नसता मला एक लाख २५ हजार रुपये दे, अशी मागणी केली. शिवाय, तत्काळ १० हजार रुपये घेतले. २५ जुलै राेजी त्याने पुन्हा मनकानी यांना पैशांचा तगादा लावला. त्याच्या त्रासाला कंटाळून त्यांनी थेट पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्याकडे तक्रार केली.
नोटांच्या आकाराचे कागदकलवानिया यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखा व चिकलठाणा पोलिसांनी यात सापळा लावून औचरमलला रंगेहाथ पकडण्याचे ठरवले. दुपारी १ वाजता एका बॅगेत वर मूळ नोटा ठेवून त्या खाली त्या आकाराचे कागदांचे बंडल ठेवण्यात आले. मनकानी वाइन शॉपमध्ये ती बॅग घेऊन बसले. दीड वाजता औचरमलने दुकानात येऊन पैशांची मागणी केली. पोलिस साध्या वेशात दबा धरून बसले होते. त्याने पैशांची बॅग घेताच पोलिसांनी त्याला उचलले. तपास अधिकारी रवींद्र साळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, औचरमल स्वत: राजकीय पदाधिकारी असल्याचे सांगतो. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, त्याने आणखी कोणाला त्रास दिला आहे का, याचा तपास तपास सुरू असल्याचे साळवे यांनी सांगितले.