- स. सो. खंडाळकर
मराठवाडा विकास आंदोलनानंतर रिपब्लिकन विद्यार्थी संघाचा अध्यक्ष या नात्याने तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे २६ जून १९७४ रोजी पत्र पाठवून विविध मागण्यांसह पहिल्यांदा मी मराठवाडा विद्यापीठ नामांतराची मागणी केली होती, याकडे प्राचार्य डॉ. एम. ए. वाहूळ यांनी लक्ष वेधले आहे. येत्या १४ जानेवारी रोजी विद्यापीठ नामांतराचा रौप्यमहोत्सव साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. वाहूळ हे ‘लोकमत’शी बोलत होते.
मागणी मी केली, हे वास्तव व त्याला अवघ्या वीस दिवसांत वसंतराव नाईक यांनी लेखी उत्तर देऊन अनुकूलता दर्शविली होती, हेही वास्तवच. मात्र सरकारी नोकरीत गेल्यानंतर मी नामांतर लढ्यात प्रत्यक्ष सहभागी नव्हतो, असे वाहूळ यांनी सांगितले. विद्यापीठ स्थापनेच्या वेळी इतर नावांप्रमाणेच बाबासाहेबांचेही नाव होते. पण विद्यापीठांना त्या- त्या प्रदेशाची वा शहरांची नावे दिली जातात, असा युक्तिवाद करून मराठवाडा विद्यापीठ असे नाव दिले गेले. पण बाबासाहेबांचे नाव न देणे हे त्या काळच्या विद्यार्थ्यांना खटकले होते. १९६० साली कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठ सुरू झाले. १९७० साली अंबाजोगाईला सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला स्वामी रामानंद तीर्थ असे नाव देण्यात आले. वसमतला गोळीबार झाल्यानंतर राज्यभरात चार कृषी विद्यापीठे सुरू झाली. पण कोकण आणि परभणी येथील कृषी विद्यापीठास नावे दिली गेली नाहीत. अकोल्यात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व राहुरीला महात्मा जोतिबा फुले कृषी विद्यापीठ सुरू करण्यात आले.
१९७२ च्या मराठवाडा विकास आंदोलनात माझे मतभेद झाले. त्या काळात वसंतराव नाईक यांच्या विरोधात वातावरण पेटविण्यात आले होते. समतोल विकास म्हणत असताना विकास कुणाचा? असा सवाल मी उपस्थित केला होता व मी बाहेर पडलो. पुढे कल्याणराव पाटील यांच्यामार्फत मी नाईक यांच्या संपर्कात आलो आणि आमच्या एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. त्यावेळी हा विद्यापीठ नामांतराचा विषय निघाला होता. मराठवाडा नावाचे दोन विद्यापीठे असल्याने संभ्रम निर्माण होतो म्हणून औरंगाबादच्या विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, ही माझ्या निवेदनातील पाचव्या क्रमांकावर मागणी होती, अशी माहिती वाहूळ यांनी दिली.