औरंगाबाद : अल्प प्रमाणात चरस बाळगल्याच्या गुन्ह्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जे. रामगडिया यांनी अर्जदार सय्यद नजिरोद्दीन सय्यद रियाजोद्दीन (रा. कटकट गेट) याला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोमवारी सशर्त जामीन मंजूर केला.
२४ ऑक्टोबर २०२१ रोजी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे नजिरोद्दीन याच्याकडून १०१ ग्राम चरस जप्त केले होते. न्यायालयाने त्याला २५ ते २७ ऑक्टोबर २०२१ दरम्यान पोलीस कोठडी सुनावली होती. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३७ नुसार एक किलो आणि त्यापेक्षा जादा प्रमाणात चरस बाळगणे म्हणजे व्यापाराच्या उद्देशाने बाळगणे असे नमूद केले आहे. वस्तुत: नजिरोद्दीनकडे १०१ ग्रॅम म्हणजे अल्प प्रमाणात चरस आढळले असून त्याला दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली होती. म्हणून तपासास पुरेसा वेळ दिला असल्यामुळे तो जामीन मिळण्यास पात्र असल्याचे न्यायालयाने म्हटले. आरोपीतर्फे ॲड. जी.एस. मुंदडा यांनी काम पाहिले.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला सशर्त अटकपूर्व जामीनअल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी हृषीकेश भागचंद मोगल याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रकाश डी. नाईक यांनी सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. हृषीकेश तक्रारदार मुलीचा पाठलाग करून सतत तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होता. घटनेच्या दिवशी १२ ऑगस्ट २०२१ रोजी त्याने मुलीचा हात ओढून तिला जबरदस्ती दुचाकीवर बसण्याचा प्रयत्न केल्यावरून त्याच्याविरुद्ध बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याने ॲड. ए. एन. राऊत यांच्यामार्फत खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.