औरंगाबाद : भारतीय जनता पार्टीत पैशांविना पदे मिळत नसल्याच्या माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांच्या आरोपाचा मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकरांनी रविवारी पत्रकार परिषदेत खरपूस समाचार घेत उत्तर दिले.
जयसिंगरावांनी भाजपमध्ये असताना उपभोगलेल्या पदांसाठी किती रक्कम दिली होती हे सांगावे, असा प्रश्न करीत बोराळकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्यावरही टीका केली. विभागीय प्रचार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बोराळकर म्हणाले, आम्ही पूर्ण ताकदीने जयसिंगरावांचा प्रचार केला. त्यांच्यासाठी रक्त, पैसे, श्रम हे कुटुंबाचा विचार न करता खर्ची घातले. गायकवाड यांनी आम्हाला मूर्ख बनविले. आमची वेळ आली तेव्हा पाठीशी उभे राहायचे सोडून आमच्यावर आरोप करीत आहेत. गोड बोलून त्यांनी आम्हाला धोका दिला. राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी पदवीधर बेरोजगारांबाबत बारा वर्षांत बारा प्रश्न तरी उपस्थित केले का, पदवीधरांसाठी एखाद्या योजनेवर काम केले का, त्यांची ‘कामे दाखवा आणि बक्षीस मिळवा’, असे माझे आव्हान आहे, असे बोराळकर म्हणाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन वकिलांसाठी पाच हजार रुपये शासनाने द्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे सांगून मराठवाड्यात कोचिंग क्लासेसवर २५ हजार शिक्षकांची उपजीविका आहे, त्यांना आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा केल्याचे बोराळकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आ. अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी, शहराध्यक्ष संजय केणेकर, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रमोद राठोड, प्रशांत देसरडा, अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष एजाज देशमुख आदी उपस्थित होते.
बोराळकर यांची वक्तव्ये बालिशपणाची
गायकवाडांचे प्रत्युत्तर : मला १२ वर्षे खुंट्याला बांधून ठेवले
औरंगाबाद : भाजपचे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार शिरीष बोराळकर यांनी माझ्या विरोधात केलेली वक्तव्ये बालिशपणाची आहेत. ते माझ्या मुलासारखे असले तरी बालिश आहेत, असे प्रत्युत्तर माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिले.
महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या विजयाचा वारू कुणीही रोखू शकणार नाही, असा दावा करीत गायकवाड यांनी भाजपत आपल्याला १२ वर्षे खुंट्याला बांधून ठेवल्याची भावना व्यक्त करीत पक्षात सध्या काम करीत असलेल्या सगळ्या नेत्यांची घुसमट होत असल्याची टीका केली. चव्हाण हे २५ हजार मतांनी निवडून येतील, चव्हाण यांनी २ हजार ८९८ प्रश्न विविध मुद्यांवरून सभागृहात मांडल्याचेही त्यांनी ठासून सांगितले.
बोराळकर यांनी आरोप केला, पोराला हळद लावायची वेळ आली आणि बाप रुसला. (अर्थात : उमेदवारी बोराळकरांना मिळाली आणि गायकवाड नाराज झाले), यावर गायकवाड म्हणाले, बोराळकर जरी मुलासारखे असले तरी ते बालिश आहेत. ते काही माझ्या निवडणुकीचे प्रचारप्रमुख नव्हते.
भाजपमध्ये प्रत्येक जण प्रत्येकाला घाबरत असून, सगळ्यांमध्ये स्पर्धा लागलेली आहे. पक्षाची घटना पायदळी तुडविली जात आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे हे देखील दोन वेळा पक्षाच्या चुकीच्या वागण्यामुळे रुसले होते. प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी एकदा तरी आंदोलनात पोलिसांची लाठी खाल्ली आहे काय, पंकजा मुंडे, खा. रावसाहेब दानवे यांनादेखील बाजूला ठेवले आहे. मतदारसंघापासून दूर नेण्याचे षडयंत्र भाजपत रचून माणसे संपविली जातात. पत्रपरिषदेला डॉ. उल्हास उढाण आदींची उपस्थिती होती.