संपूर्ण लॉकडाऊनमुळे शहरातील जवळपास ५०० हॉटेल्स तसेच १३०० रेस्टॉरंटस व बारमध्ये काम करणारे लोक बेरोजगार होतील आणि त्यातून होणाऱ्या आर्थिक नुकसानामुळे पूर्ण यंत्रणा दिवाळखोरीकडे ढकलली जाईल, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
आर्थिक संकटामुळे अनलॉकनंतर २० टक्के हॉटेल- रेस्टॉरंट पूर्णपणे बंद झाली असून, अजूनही जवळपास ३० टक्के हॉटेल, रेस्टॉरंट सुरू झालेली नाहीत. तर बाकीची लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे पुन्हा एकदा बंद होण्याची वेळ आली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढते आहे, हे खरे असले तरी आधीच डबघाईला आलेल्या या व्यवसायालाच जबाबदार धरणे योग्य नाही, असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आम्ही संपूर्ण काळजी आणि सुरक्षा घेऊनच व्यवसाय करू, त्यामुळे हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, असेही एचआरएडब्ल्यूआयचे अध्यक्ष श्री शेरी भाटिया यांनी राज्य शासनाला निवेदनातून सांगितले आहे.
चौकट :
केवळ हॉटेल आणि रेस्टॉरंटलाच केले टार्गेट
जिल्हा प्रशासनाने केवळ हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगालाच लक्ष्य केले असून अतिशय कठोर निर्णय घेतला आहे. सगळ्या नियमांचे पालन करूनही हॉटेल आणि रेस्टॉरंट कारवाईच्या विळख्यात आले आहेत. या निर्णयामुळे या व्यवसायाशी संबंधित लोकांवर होणारा परिणाम प्रशासनाने विचारात घ्यावा आणि हा निर्णय मागे घ्यावा, असे विनंती संस्थेचे प्रवक्ते हरप्रीत सिंग यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली.