औरंगाबाद : धनगर समाजाला तात्काळ एसटीचे आरक्षण देण्यात यावे, अन्यथा मंत्रालयात व मंत्र्यांच्या घरांमध्ये मेंढरे सोडू असा इशारा औरंगाबाद येथे सोमवार दि. २१ रोजी झालेल्या धनगर समाज आरक्षण कोअर कमिटीच्या बैठकीत देण्यात आला.
गजानन महाराज मंदिरासमोरील पत्रकार संघाच्या बैठकीत यशवंत सेनेचे नेते भारत सोन्नर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी रवी वैद्य, विकास सुसर, सुरेश डोळे, रणजीत खांडेकर, देविदास कोळेकर, ईश्वर शिंदे, नवनाथ सातपुते, बाळकृष्ण शेवंते, सांडू बनसोडे, पोपट गवरे, अमृत पारधे, ताराचंद्र पवार, प्रमोद खाडे, दत्ता नवले, भगवान शिंदे, अशोक भावले, सखाराम भोजने, तुकाराम पाटील, दीपक महानवर, कैलास रिठे, विष्णू कोरडे, गणेश सातपुते, विजय निर्मळ आदींची उपस्थिती होती.
यासंदर्भात भारत सोन्नर म्हणाले की, भाजपने आमचे सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असे २०१४ साली दिलेले आश्वासन पाळलेले नाही. धनगर समाजाचा भाजपने विश्वासघात केला. तसेच धनगर समाजाच्या विकासासाठी एक हजार कोटींचा जीआर काढण्यात आला. पण त्याचीही अंमलबजावणी करण्यात आली नाही.
महाविकास आघाडी सरकारनेही धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्या दिशेने कुठलीच कारवाई होताना दिसत नाही. एक दिवसीय अधिवेशन बोलावून धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. समाजाचा संयम सुटू देऊ नका, अन्यथा मंत्रालय व मंत्र्यांच्या घरांमध्ये मेंढरे सोडण्याचे आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशाराही सोन्नर यांनी दिला.