छत्रपती संभाजीनगर : १८ लाख लोकसंख्या असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहराची सलग चार दिवस तहान भागेल एवढ्या पाण्याची रोज जायकवाडी प्रकल्पात वाफ होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढत असल्याने बाष्पीभवन वाढल्याची माहिती लाभक्षेत्र कडा विकास प्राधिकरणाने (कडा) दिली.
मराठवाड्याची राजधानीचे शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरसह जालना, पैठण शहर आणि एमआयडीसीला जायकवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. यासोबत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यातील सुमारे १ लाख ४० हजार हेक्टर आणि बीड जिल्ह्यातील सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्र जायकवाडी प्रकल्पामुळे ओलितखाली येते. यामुळेच जायकवाडी प्रकल्पाला मराठवाड्याचा भाग्यविधाता म्हणून ओळखल्या जाते. महिनाभरापासून मराठवाड्यातील तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे.
छत्रपती संभाजीनगरचे तापमानाने ४२अंश सेल्सिअस पर्यंत वाढले होते. वाढत्या तापमानाचा सर्वाधिक परिणाम पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातील जलसाठ्यावर होऊ लागला आहे. वाढत्या तापमानामुळे जायकवाडी प्रकल्पातील जलसाठ्यातील रोज सुमारे ५२० एमएलडी पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. हे पाणी छत्रपती संभाजीनगर शहराला सलग चार दिवस पुरेल एवढे असल्याचे कडाचे अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांनी सांगितले.
ते म्हणाले की, ३५ हजार हेक्टरवर पसरलेल्या या प्रकल्पापैकी आज केवळ २० हजार हेक्टरवर पाणीसाठा पसरलेला आहे. प्रकल्पात केवळ १० टक्के पाणीसाठा उरला आहे. यातच वाढत्या तापमानामुळे रोज लाखो लिटर पाण्याचे बाष्पीभवन हाेत आहे. हे बाष्पीभवन रोखण्यासाठी उपाययोजना करणेही खर्चिक असल्याने त्याचा वापर केला जात नाही.