मुंबई - मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तत्पूर्वी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ओबीसी नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. ओबीसी नेत्यांच्या हट्टीपणामुळेच मराठा आणि ओबीसी बांधवांमध्ये संभ्रम होत असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यानंतर, आज जरांगे पाटील चितेपिंपळ येथे आले होते. त्यावेळी त्यांच्यावर फुलांची उधळण करत जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी गाडीच्या टपावर उभे राहूनच लोकांशी संवाद साधला. दरम्यान, बीडमधील मराठा समाजाच्या तरुणांना विनाकारण अडवलं जात असल्याचंही ते म्हणाले.
मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू असताना काही ठिकाणी मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातूनच, बीडमध्ये हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घर व कार्यालयात जाळपोळ करण्यात आली होती. तसेच, काही नेत्यांच्या गाड्याही आंदोलकांनी अडवल्या होत्या. मात्र, जाळपोळ करणारे मराठा समाजाचे आंदोलक नाहीत, असा दावा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे. तसेच, मराठा समजातील तरुणांना नाहक अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचंही जरांगे यांनी म्हटले. याप्रकरणी, बीडमधील मराठा समाजाच्या युवकांवर होणारा अन्याय थांबवा, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, त्यांना नाहक अडकवलं जात आहे, ते सरकारने थांबवावे. अन्यथा बीडमधील मराठा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी बीडच्या प्रकरणात लक्ष्य घालावे. बीडच्या घटनेचं राजकारण होत असून गोरगरिबांची पोरं गुंतवली जात आहेत. दोन दिवसांत हे थांबवा, अन्यथा दोन दिवसांत बीडमधील मराठा समाज रस्त्यावर उतरणार आहे, पुन्हा तुमच्याच अधिकाऱ्यांमुळे कायदा व सुव्यवस्था भंग होऊ नये ही माझी तुम्हाला विनंती आहे, असा इशाराच जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.
दहा दिवसांनंतर उपोषणस्थळी
वडीगोद्री (जि. जालना) : छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे दहा दिवसांनी रविवारी सायंकाळी अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी दाखल झाले. अंतरवालीतील उपोषणस्थळी जरांगे पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच एका घरी लक्ष्मीपूजनही केले.
भुजबळांवर निशाणा
मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांची अंबडमध्ये जाहीर सभा नियोजित आहे. यावर जरांगे म्हणाले की, ओबीसी समाजालाच वाटते की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. केवळ ओबीसी नेते मराठा समाजाविरोधात विष पसरवीत आहेत. ओबीसी नेत्यांनी जाती-जातींमध्ये भांडण लावू नये.
गावातील बोर्ड फाडल्यावरुन इशारा
जरांगे यांनी मराठा समाजाला एकजुटीचे आवाहनही केले. ते म्हणाले की, गावात यायचे असेल तर येऊ द्या; पण बोर्ड फाडून यायचे नाही. इथून पुढे जर प्रवेशबंदीचा बोर्ड फाडला तर महाराष्ट्रातील मराठे आम्ही तुमच्या मागे लागू. आमच्या नादी लागू नका.
बीडमध्ये पोलिसांकडून धरपकड
बीडमधील जाळपोळ प्रकरणात पोलिसांकडून ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवत त्यांना अटक करण्याची मोहीम राबवली आहे. ज्यात आतापर्यंत १८१ जणांना बेड्या ठोकण्यात आले आहे. अजूनही पोलिसांची धरपकड सुरूच आहे. ऐन दिवाळीत पोलिसांची धरपकड सुरु असल्याने अनेकांनी शहर सोडले आहे. मात्र, या सर्व आरोपींना शोधून इतर जिल्ह्यात जाऊन पोलीस त्यांना ताब्यात घेत आहे.