औरंगाबाद : सभा सुरू करण्यासाठी पाऊणतास ताटकळले. ३ तास चालणारी जिल्हा परिषद स्थायी समितीची शुक्रवारची सभा सव्वातासात पदाधिकारी आणि प्रशासनाने गुंडाळल्याने सदस्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली, तर नका ना नादी लावू, आम्हाला दुधखुळे समजता का, सदस्यांना वेठबिगार समजू नका, वेळेचे भान ठेवून सभेची वेळ द्या, घाई होती तर पुरेसा वेळ असताना सभा घ्यायला हवी होती, सदस्यांची गळचेपी सहन करणार नाही, असे म्हणत ज्येष्ठ सदस्य मधुकर वालतुरे यांनी सभात्याग केला.
औरंगाबाद पंचायत समितीच्या सभागृहात अध्यक्ष मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली अनेक दिवसांनंतर स्थायी समितीची बैठक सदस्यांच्या आग्रहास्तव ऑफलाइन पद्धतीने शुक्रवारी घेण्यात आली. पाऊणतास उशिरा दुपारी पाऊणेदोन वाजता बैठकीला सुरुवात झाली. ग्रामविकास राज्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक अडीच वाजता असल्याने सुरुवातीला सभा तहकूब करून नंतर घेऊ, असे सांगून विषयसूचीवरील विषय न वाचता मंजूर करण्यात आले. विषयसूचीवरील विषयांना मान्यता मिळाल्यावर तहकूब सभेत आयत्या वेळीचे विषय घेता येणार नाहीत, हे तांत्रिक कारण दाखवून सभा दुपारी तीन वाजता गुंडाळण्यात आल्याने सदस्य जितेंद्र जैस्वाल, शिवाजी पाथ्रीकर, किशोर पाटील यांच्यासह वालतुरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, तर दरवेळी आठवडाभरात पुन्हा सभेचे आश्वासन देऊन ती होत नसल्याचा अनुभव असल्याने नका ना नादी लावू, दुधखुळे समजता का आम्हाला, असे म्हणून वालतुरे हे निषेध नोंदवून सभेतून निघून गेले. रमेश पवार, किशोर पवार, जितेंद्र जैस्वाल, उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, सभापती किशोर बलांडे यांनी लोंबकळलेल्या तारा, न मिळालेले वीज कनेक्शन आदी प्रश्न मांडले. मात्र, महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांच्या मोघम उत्तरावर त्यांचे समाधान होऊ शकले नाही. त्यामुळे पुढच्या बैठकीत तयारीने येण्याची सूचना अध्यक्षांकडून करण्यात आली. सव्वातासाच्या बैठकीत एकमेकांची उणीदुणी आणि टोलेबाजी मनोरंजनाचा विषय ठरली.
----
सहा महिने राहिले, कसे होईल
सहा महिन्यांचा कार्यकाळ राहिला. वित्त आयोगाचे गेल्या हप्त्याचे पैसे खर्च झाले नाहीत. पीएफएमएसप्रणालीने खर्चाचे बंधन असल्याने विकासकामे खोळंबली आहेत, असेच झाले तर कसं होईल, अशी भीती व्यक्त करीत चेकद्वारे खर्चाला मंजुरीची मागणी स्थायी समितीत करण्यात आली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी अशी मान्यता देता येणार नसल्याचे अतिरिक्त सचिवांचे आदेश असल्याचे सांगून पीएमएमएस प्रणालीवरून खर्चाला गती देण्यासाठी नियोजन करण्याची ग्वाही सदस्यांना दिली.
---
उणीदुणी, एकमेकांवर टोलेबाजी
शिवसेनेचे सदस्य केशवराव तायडे यांनी आरोग्य विभागाचे काम चांगले झाले; पण कुठे, कशावर काय खर्च केला त्याचा लेखाजोखा स्थायी समितीसमोर मांडण्याची मागणी केली. त्यावर बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी तायडे यांची खिल्ली उडवीत काम चांगले तर अडचण काय, तुमच्या कार्यकाळात माहिती दिली जात होती का, असा सवाल केल्यावर तायडे यांनी नाराजी व्यक्त केली, तर सर्व माहिती आरोग्य विभाग सदस्यांना देईल, अशी ग्वाही आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी दिली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच एकमेकांची उणीदुणी काढल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.