- प्रशांत सोळुंके
चिंचोली लिंबाजी (जि. औरंगाबाद) : शेतीवर यापूर्वीही अनेक संकटे आली; पण परवाचा परतीचा पाऊस हे सर्वात विनाशकारी संकट ठरले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासोबत जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न शेतकऱ्यांना सतावत असून, शासनाने विनाविलंब आर्थिक मदत करावी, नाही तर आमच्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग नाही, अशी प्रतिक्रिया हताश झालेल्या चिंचोली लिंबाजी परिसरातील शेतकऱ्यांनी दिली.
चिंचोली लिंबाजीसह नेवपूर जा., नेवपूर खा., रेऊळगाव, वाकी, घाटशेंद्रा, वडोद, टाकळी अंतूर, तळनेर, लोहगाव, बरकतपूर, रायगाव, गणेशपूर, जामडी, दहिगाव, शेलगाव, दिगाव, खेडी आदी सुमारे २५ गावांतील शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला. संपूर्ण शेतात पाणी साचले आहे. मका, ज्वारी, बाजरीच्या कणसाला कोंब फुटले आहेत. वेचणीला आलेल्या कापसाची बोंडे काळी पडून सडू लागली आहेत. मुसळधार पावसामुळे परिसरातील शेकडो हेक्टरमधील पिके नष्ट झाली आहेत. पूर्णपणे सडल्याने चाऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
नेवपूर येथील शेतकरी संजय सोळुंके म्हणाले की, आमच्याकडे दीड एकर जमीन आहे. त्यात अर्धी मका व अर्ध्यात कापूस लागवड केली होती. ही दोन्ही पिके गेली. खाजगी कंपनीत नोकरी करीत होतो. मात्र, आर्थिक मंदीमुळे ते कामही गेले. मागील वर्षी कर्ज काढून मुलीचे लग्न केले. आता ते कसे फेडावे, असे सांगत असताना त्यांचे डोळे पाणावले.
चिंचोली लिंबाजी येथील शेतकरी लक्ष्मण पंडित पवार यांची तीन एकर मका, त्यांचे भाऊ माधवराव पंडित यांची दीड एकर मका व दिगांबर बारकू गोरे यांची एक एकरातील मका परतीच्या पावसाने वाया गेली. ‘आम्ही शेतीमध्ये अनेक वेळा नैसर्गिक संकटे अनुभवली; पण हे संकट सर्वात भीषण ठरले. सरकारने आम्हाला तात्काळ आर्थिक मदत देऊन शेतीला उभारी द्यावी; अन्यथा आम्हा शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही’, असे हताश होऊन हे शेतकरी म्हणाले.