मुंबई - राज्य सरकारनं रेड झोनमधल्या मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. मात्र, मुंबई, पुण्यातील कंटेन्मेंट झोनमधील दारुची दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. केंद्र सरकारनं दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी दिली. मात्र, राज्य सरकारच्या या मागणीला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. औरंगाबाद हे सध्या रेड झोनमध्ये असल्याने येथे दारूविक्री बंदच राहावी, अशी मागणी जलील यांनी केली आहे. तसेच, जर दारुविक्री सुरु केली, तर आम्ही लॉकडाऊनचे नियम मोडून रस्त्यावर उतरू, असा इशाराच जलील यांनी दिलाय.
सध्या रेड झोनमध्ये केवळ अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानं सुरू आहेत. मात्र आता त्या व्यतिरिक्त इतर वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांनादेखील परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये मद्यविक्री करणाऱ्या दुकानांचा समावेश होतो. मात्र अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानं सुरू असताना काही नियम पाळावे लागणार आहेत. एका लेनमधील केवळ पाचच दुकानं सुरू राहू शकतात. मद्यविक्री करणारी दुकानं सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असला तरी अद्याप स्पा, सलून, पार्लर याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहरात दारुविक्रीला परवानगी दिल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय.
दारुविक्रीला परवानगी देण्याची ही योग्य वेळ नाही. रेड झोन असलेल्या औरंगाबादमध्ये सरकारने दारुची दुकाने उघडल्यास आम्ही सक्तीने ही दुकाने बंद पाडू. प्रसंगी लॉकडाऊनचे सर्व नियम मोडून आम्ही रस्त्यावर उतरू, यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश दिसेल, असेही जलील यांनी म्हटले. तसेच, कुटुंबातील माता-भगिनींना या दारुविक्रीमुळे त्रास होऊ शकतो, असे म्हणत कौटुंबीक हिंसाचाराकडेही जलील यांनी लक्ष वेधले.
आशुतोष शर्मा यांचं वीरमरण देशाची मोठी हानी, ५ वर्षात पहिल्यांदाच सैन्यानं 'कर्नल' गमावला