औरंगाबाद : शहरातील सिडको कॅनॉट परिसरामध्ये महाराणा प्रताप यांचा पुतळा न उभारता त्या पैशातून सैनिकी शाळा सुरु करावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली होती. यावरून आता शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत प्रतिउत्तर दिले आहे. शिवसेना जिल्हाध्यक्ष आ. अंबादास दानवे यांनी, महाराणा प्रताप देशाचा गौरव होते, कदाचित तुम्हाला महापुरुषांच्या पुतळ्यातून प्रेरणा मिळत नसावी अशी खरमरीत टीका केली आहे.
पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मागील महिन्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. अतुल सावे, अंबादास दानवे यांनी सिडको कॅनॉट परिसरामध्ये महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याच्या कामास सुरुवात करण्याची मागणी केली होती. बैठकीतच त्यांच्या मागणीला जलील यांनी विरोध करून पुतळा उभारणीवर खर्च करण्यात येणाऱ्या निधीतून ग्रामीण भागातील युवक व युवतींना राष्ट्रीय सेवेसाठी सैनिक शाळा सुरु करण्याची मागणी केली होती. यानंतर गुरुवारी त्यांनी पत्राद्वारे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मागणी केली. यामुळे उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. यातच शिवसेनेने खासदार जलील यांच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे.
शिवसेना जिल्हाध्यक्ष आमदार अंबादास दानवे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून खा. जलील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. आ.दानवे म्हणाले, ''महाराणा प्रताप यांचे एक वाक्य आहे, 'शासक का पहला कर्तव्य अपने राज्य का गौरव और सम्मान बचाए रखना होता है।' महाराणा प्रताप हे या देशातील 'हिंदुत्वाचा' गौरव आहेत...जलील साहेब महापुरुषांच्या पुतळ्यांकडून आपल्याला चांगल्या कामाला प्रेरणा मिळत नसावी कदाचित....ती आम्हाला मिळते...''. तसेच आठवण करून देतो, ''केंद्र सरकारने देशातील १०० शाळा यावर्षी संलग्नित करून त्यांना सैनिकी शाळेचा दर्जा द्यायचे ठरवले आहे. यातील एखादी शाळा दिल्लीत जाऊन जिल्ह्यासाठी आणावी, शहर वाढतंय, शहरातील केंद्रीय विद्यालयाच्या विस्तारासाठी दिल्लीत थोडे श्रम खर्ची पाडता आले तर पहा'' असा टोलाही आ. दानवे यांनी लगावला.