- विकास राऊत
औरंगाबाद : विधानसभानिवडणूक तोंडावर आली आहे. इच्छुकांनी स्वत:ची उमेदवारी जाहीर करण्यासाठी समर्थकांना ‘सोशल मीडिया’तून (समाजमाध्यमे) कामाला लावले आहे. यातून समर्थकांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली असून, प्रकरणे हाणामारीपर्यंत जाऊ लागली आहेत.
औरंगाबाद मध्य मतदारसंघात शिवसेनेचे माजी आ. प्रदीप जैस्वाल व शिवाजीनगरचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांच्या समर्थकांत आमदारकीच्या उमेदवारीवरून ‘सोशल मीडिया’त सध्या जोरदार युद्ध सुरू आहे. दोघांचेही समर्थक एकमेकांना डिवचणाऱ्या ‘पोस्ट’ फेसबुक व इतर समाजमाध्यमांतून ‘व्हायरल’ करीत आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी शेवटच्या पातळीपर्यंत खेचाखेची सुरू आहे. विशेष म्हणजे काही समर्थक मतदारसंघातील नसून, इतर मतदारसंघांतील आहेत.
‘मध्यमधून कोण आमदार? नको पुन्हा हा सवाल’ या जैस्वाल समर्थकांच्या पोस्टला एकनिष्ठता, लायकी आता जनताच ठरविणार, असे जंजाळ समर्थक उत्तर देत आहेत. या पलीकडे जाऊन काही पोस्ट आहेत, ज्या एकमेकांच्या जिव्हारी लागणाऱ्या आहेत. सोशल मीडियात शब्दप्रपंच मांडून समर्थक एकमेकांच्या अंगावर धाऊन जात आहेत. पक्ष कोणाला उमेदवारी देणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र, पक्ष निर्णयाआधीच दोघांच्या समर्थकांनी वातावरण तापविण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियातील हा सगळा प्रकार जैस्वाल व जंजाळ यांना माहिती असेलच? परंतु यावरून दोघेही अद्याप आमने-सामने आलेले नाहीत. त्यामुळे सध्या समर्थकांमध्येच सोशल वॉर असल्याचे दिसते आहे; पण जसजशी विधानसभानिवडणूक जवळ येईल, तसतसे हे युद्ध मोठ्या वेगाने भडकेल, असे दिसते.
पुंडलिकनगरमध्ये काय घडले?१३ जुलैच्या मध्यरात्री पुंडलिकनगर परिसरातील हनुमान चौकात जैस्वाल-जंजाळ (युवासेना) समर्थकांत जोरदार हाणामारी झाली. प्रकरण पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या उंबरठ्यावर गेले. दोघांच्या समर्थकांनी एकमेकांच्या सोन्याच्या साखळ्या चोरल्याची तक्रार देण्याची तयारी केली.दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी आपापल्या नेत्यांना फोन केले, प्रकरणाला राजकीय वळण लागणार म्हणून कुणीही ठाण्याकडे आले नाही. दरम्यान, चर्चेअंती हे प्रकरण पहाटे ४ वाजता मिटले. या सगळ्या प्रकरणानंतर पहाटे युवासेनेच्या चिकलठाण्यातील एका पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण झाल्याची चर्चा रविवारी होती. मतदारसंघ मध्य आणि वाद फुलंब्री आणि पूर्व मतदारसंघांतील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांत सुरू झाला आहे.