छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाच्या व खुल्या प्रवर्गाच्या मागासलेपणाच्या सर्वेक्षणासाठी गोखले इन्स्टिट्यूट या संस्थेकडून सॉफ्टवेअर येताच १५ दिवसांत पूर्ण करावे लागणार आहे. राज्यात एकाच वेळी या सर्वेक्षणासाठी सुरुवात होणार आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने या सर्वेक्षणासाठी ३१ डिसेंबर २०२३ रोजी अंतिम सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली. आयोगाच्या सूचनेप्रमाणे प्रशासकीय यंत्रणेला सर्वेक्षणापूर्वी एक प्रशिक्षण पुण्यात देण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्ह्यात ब्लॉकनिहाय सर्वेक्षणास सुरुवात होईल, असेही सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यातील सुमारे १३०० गावांसह शहरातील ११५ वॉर्डात सर्वेक्षण करण्यात येईल. त्याचे टप्पे कसे असतील, हे अद्याप जाहीर नाही. घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मराठा समाजाला आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य मागासवर्ग आयोगाने काही निकष ठरविले आहेत. आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक या निकषांच्या आधारे सर्वेक्षण होईल. सर्वेक्षण प्रक्रियेसाठी प्रशासनाने तयारी केली आहे. समाजाच्या मागासलेपणाच्या निकषासाठी काही मुद्दे निश्चित केले आहेत. त्या आधारे गुण दिले जाणार आहेत. शैक्षणिक व आर्थिक निकषांसाठी असलेल्या मुद्द्यांवर गुण दिले जातील. २५० गुणांचा तक्ता सर्वेक्षणामध्ये सॉफ्टवेअरमध्ये भरून घेण्यात येणार आहे.