औरंगाबाद : जिल्ह्यातून जाणारा १२४ कि.मी. लांबीचा सोलापूर-औरंगाबाद-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ (जुना रा.म. २११) पूर्ण क्षमतेने ऑगस्टअखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी या महामार्गाच्या कामाची पाहणी करताना, करोडी येथे होणाऱ्या टोलनाक्याबाबत काही सूचना केल्या.
सध्या या मार्गाचे काम ९० टक्के पूर्ण असून, ऑगस्टअखेरीस काम पूर्णत्वास जाईल, असा दावा एनएचएआय अधिकाऱ्यांनी केला. महामार्गाच्या कामासाठी असलेले मजूर, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे काम संथगतीने सुरू आहे. या मजूर, कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्याबाबत जिल्हा प्रशासनाशी एनएचएचआयने पत्रव्यवहार केला आहे.
करोडी येथे प्रस्तावित टोल प्लाझासाठी संपादित केलेल्या जागेची पाहणी करीत, टोल प्लाझावर वाहनधारकांसाठी स्वच्छतागृह, वैद्यकीय सुविधा, सीसीटीव्ही, फास्ट टॅग सुविधा उपलब्ध करण्याची सूचना केली.
औरंगाबाद ते करोडी या ३० कि.मी.च्या कामाला ५१३ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. महामार्ग लवकर वाहतुकीस खुला झाल्यानंतर शहरामधील बीड बायपास रस्त्यावरील वाहतूक नवीन रस्त्याने वळविणे शक्य होणार आहे.
महामार्गाचे काम एल अॅण्ड टी कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत होत आहे. मुरमा ते औरंगाबाद हे ३८ कि.मी., करोडी ते तेलवाडी हे ५६ कि.मी. अंतर मिळून एकूण ९४ कि.मी. काम पूर्ण झाल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
औरंगाबाद ते शिर्डी १० मीटरचा होणार
औरंगाबाद (करोडी ते शिर्डी) या ८० कि.मी. लांबीच्या रस्त्याची रुंदी ७ मीटरवरून १० मीटर करण्यात येणार असून, त्यासाठीची जागा उपलब्ध आहे. त्यामुळे अतिरिक्त भूसंपादनाची आवश्यकता नाही. या रुंदीकरणासाठीचा डीपीआर त्वरित बनवून सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.