लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूसह समितीने विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव दिल्यास समाजात तेढ निर्माण होऊन विकासात अडचणी येतील, असा खुलासा केल्याने धनगर समाज आक्रमक झाला आहे. कुलगुरुसह समितीवर गुन्हा नोंदविण्याची मागणी यशवंत सेनेचे भारत सोन्नर यांनी केली आहे. यासंदर्भात तीव्र आंदोलन छेडणार असून सोलापूरमध्ये बैठकही घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.अहिल्यादेवी होळकर यांचे सोलापूर विद्यापीठाला नाव देण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून आहे. यासाठी राज्यभर धनगर समाजाच्या वतीने आंदोलने होत आहेत. याचे पडसाद पावसाळी अधिवेशनात दिसून आले. एका आमदाराने याबाबत प्रश्नही उपस्थित केला होता. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यापीठाला अहिल्यादेविंचे नाव देता येणार नाही, विद्यापीठाला जर अहिल्यादेविंचे नाव दिले तर समाजात तेढ निर्माण होईल व विकासात अडचणी निर्माण होईल, असा अहवाल कुलगुरू व समितीने दिला आहे, असा खुलासा केला. वास्तविक पाहता अहिल्यादेविंनी जात-पात विसरून सर्वांना एकत्र आणले. अशा अहिल्यादेविंबद्दल असा संशय व्यक्त केल्याबद्दल धनगर समाजाच्या भावना दुखावल्या असून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यासाठी यशवंत सेनेने बैठक घेतली असल्याचे भारत सोन्नर यांनी सांगितले. बैठकीला चेतन नरवटे, सुरेश पाटील, संजय कोळी, उमेश काळे, राम जवान, अनिल घोडके, शेखर बंगाळे, माळप्पा नवले, दीपक गवळी, रणजित खांडेकर, अशोक भावले, उमेश निर्मळ, रामनाथ यमगर, कैलास निर्मळ, रावसाहेब नवले, राम कोळेकर, प्रवीण कोळेकर, सोमनाथ आपटे उपस्थित होते.
सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू, समितीवर गुन्हा नोंदवा - सोन्नर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:41 AM