फुलंब्री : तालुक्यातील मारसावळी गावातील महिलांनी सौर वाळवणी ( सोलार ड्रायर) यंत्राच्या माध्यमातून रोजगाराचा आधार शोधला आहे. या माध्यमातून ४५ महिला स्वबळावर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. मागील तीन वर्षापासून या महिलांनी घराचा सर्व खर्च उचलत कुटुंबाला कायमच्या आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यास हातभार लावला आहे. kadhle
फुलंब्री पासून राजूर मार्गावर पिरबावडा पासून डोगरावरती वसलेले मारसावळी गाव. तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावात मुख्यतः शेती व्यवसाय येथे ७० टक्के जमीन जिरायत तर केवळ ३० टक्केच जमीन बागायती आहेत. मागील काही वर्षापासून येथील काही कुटुंब ऊसतोडणीला जात होते. स्थानिक महिला मजुरी करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जात. मात्र आता रोजगारासाठी गाव सोडाव्या लागणाऱ्या कुटुंबांना 'सोलार ड्रायर'च्या माध्यमातून घरबसल्या रोजगार उपलब्ध झाला आहे. यातून गावातील तब्बल ४५ महिलांना आर्थिक पाठबळ मिळत आहे.
सायन्स फोर सोसायटी या संस्थेने २०१९ मध्ये मारसावळी येथे येऊन पाहणी केली. महिलांचे स्थलांतर थांबविण्यासाठी, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता त्यांनी प्रयत्न सुरू केले. पहिल्यांदा गावातील पाच महिलांच्या हातात सोलार ड्रायरचे छोटेखानी काम उपलब्ध करून दिले. आता ४५ महिला यात सहभागी आहेत. त्या प्रत्येक महिलाच्या घरी कंपनीने सोलार ड्रायर, एफबिडी फॉन मशीन, भाजीपाला कापणारी मशीन उपलब्ध करून दिली आहे. या महिला दररोज सकाळी घरकाम आटोपल्यानंतर दोन ते तीन तास कांदा, लसूण,अद्रक, टोमॅटो या भाजीपाल्यावर प्रक्रिया करून त्याला सुकवून कट्टे तयार करतात. तयार झालेला सुका माल कंपनी गावात घेऊन घेऊन जाते व पैसे देते. एक क्विंटल सुका भाजीपाला देऊन एका दिवसाला साडेबारा हजार रुपये महिलांना मिळतात. तर महिन्याला साडेतीन लाख रुपये या माध्यमातून गावात येतात.
कर्ज फिटले, मुलांचे शिक्षण झाले सायन्स फॉर सोसायटी च्या माध्यमातून २०१९ मध्ये भाजीपाला प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला अडचणी आल्या पण आजघडीला काम योग्यरीत्या सुरु आहे. यातून मिळालेल्या पैशांतून कर्ज फेडता आले. तसेच मुलाच्या शिक्षणाला हातभार लावता आला. घरखर्चही भागत आहे. - कविता चंद्रकांत गाडेकर
कुटुंबाला आर्थिक सक्षम केलेपाऊस नसेल तर शेतीत काही मिळत नाही. तीन वर्षापूर्वी मजुरी करण्यासाठी जात होते. पण आता घरबसल्या हाताला काम मिळाले. महिन्याला पैसे मिळत असल्याने कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करता आले. - रेखा अशोक दुधे